जिल्ह्यातील एकूण पोलीस अधिकारी -३२६
अकोला : अकोला शहरासह जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक बंदोबस्त लावण्यात येताे. विविध धार्मिक सण-उत्सवांमध्ये पोलीस २४ तास ऑन ड्यूटी असतो. त्यातच मागील वर्षापासून कोरोनाचे थैमान माजले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटातही पोलिसांनाच रस्त्यावर उभे करण्यात आले आहे. दिवस-रात्र ड्यूटी करणाऱ्या पोलिसांवर मानसिक ताण प्रचंड वाढला आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे कुटुंबीय अशी तारेवरची कसरत पोलीस करीत आहेत; मात्र नागरिक काहीही ऐकत नसल्याने पोलिसांना कारवाईही करावी लागत आहे. मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे म्हणून पोलिसांसाठी आरोग्य शिबिरे, योग-प्राणायाम शिबिरे घेण्यात येत आहेत; मात्र तरीही गुन्हेगारांना अटक करणे, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे, चोऱ्या घरफोड्या, हत्या, हाणामारी, कौटुंबिक हिंसाचार यासह विविध प्रकरणांचा तपास करणे, समाजकंटकांवर कारवाई करणे अशा प्रकारचे विविध काम करून कोरोनाचा बंदोबस्तही करावा लागत असल्याने पोलिसांवरील मानसिक दडपण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपाधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हेशाखा प्रमुख शैलेश सपकाळ व दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांनी केले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला तळपत्या उन्हात रस्त्यावर कार्यरत राहावे लागते. आम्ही माणूस आहोत. आम्हालाही कोरोनाचा धोका आहे. आमच्या कुटुंबीयांना कोरोनाची भीती आहे. १२ तासांपेक्षा अधिक ड्यूटी केल्यानंतर लहान मुलांमुळे घरी जाण्याची भीती वाटते; मात्र तरीही आरोप पोलिसांवर होतात. नागरिकांनी या काळात घरी राहिल्यास पोलिसांचा ताण कमी होईल; मात्र अनेकांची मानसिकता ही न समजण्यापलीकडे आहे.
- एक पोलीस कर्मचारी
पोलीस म्हणजे सामान्य माणूस आहे. नागरिकांनी वाहनाचे दस्तावेज बाळगावे, सुरक्षितता ठेवावी म्हणून पोलिसांना काम करावे लागते. प्रत्येकाने जागरूक राहून आपले कर्तव्य पार पाडले तर पोलिसांवर होणारे आरोप कमी होतील. आणि त्यांचा ताणही कमी होईल; मात्र स्वतः सर्व नियमांचे उल्लंघन करायचे आणि नंतर पोलिसांवरच दोषारोप करायचे, अशी आपल्या समाजाची मानसिकता झालेली आहे. कोरोनाची भीती कुटुंबीयांच्या मनात प्रचंड आहे. कुटुंबीयांकडून नोकरी सोडण्याचे सांगण्यात येते; मात्र हा उदरनिर्वाह चालविण्याचे मुख्य साधन असल्याने ते कर्तव्य चोखपणे बजावतो.
-एक पोलीस कर्मचारी
प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळताना प्रत्येकाचे लसीकरण करण्यात आले आहे. पोलिसांसाठी हँड ग्लोव्हज, सॅनिटायझर, मास्कची सुविधा करण्यात आली आहे. योग-प्राणायाम शिबिरे घेऊन पोलिसांचे मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विविध उपाययोजना राबवून प्रत्येक पोलिसावर समान कामाचे वाटप व्हावे याचीही खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामध्ये बंदोबस्त आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक चौकात मंडप टाकण्यात आला आहे. पाण्याची व जेवणाची सुविधा त्यांना जागेवर देण्यात येते. पोलीस मुख्यालयातील जिम तसेच व्यायामासाठी त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून योग्य त्या सुविधा पुरविण्यात येत आहेत.
जी. श्रीधर
पोलीस अधीक्षक, अकोला