मलकापूर/शेगाव (जि. बुलडाणा) : हावडा- अमृतसर रेल्वेमध्ये सीआरपीएफचे जवान व स्टाफ असल्याची बतावणी करीत अपंगांच्या राखीव बोगीत घुसून दोघांनी लूटमार केल्याची घटना २३ सप्टेंबरला पहाटे मलकापूर रेल्वे सुरक्षा बलाच्या हद्दीत घडली. रेल्वे सुरक्षा बलाने या प्रकरणी गुजरातमधील कच्छ भागातील पुलमा येथील शे. रहीम शे. मोहम्मद आणि अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ भिलापूर येथील अरविंद पंडितराव बाठे या दोघांना रेल्वे पोलिस दलाच्या ताब्यात दिले आहे. हे दोघे हावडा-अमृतसर रेल्वे क्रमांक १२८३४ मधील जनरल बोगीतून प्रवास करीत असताना मलकापूर रेल्वेस्थानकावर अपंगांच्या बोगीत चढले. रेल्वे सुरू होताच त्यांनी बोगीतील अपंगांना मारहाण करून लुटमार सुरु केली व त्यांच्याकडील पैसे लुटले. हा प्रकार प्रवाशांनी रेल्वे गाडीतील स्कॉटिंग स्टाफला सांगितल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक एस.एस.हरणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक वर्मा, आरक्षक रंजन तेलंग, संजय कायंदे, शंकर घाटोळे यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत भुसावळ रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलीस दलाच्या (राज्य शासन) ताब्यात देण्याचा प्रयत्न केला; मात्र घटना मलकापूर हद्दीत घडलेली असल्यामुळे त्यांनी या आरोपींना ताब्यात घेतले नाही. परिणामी रेल्वे सुरक्षा बलाच्या पाचही अधिकारी व कर्मचार्यांनी लुटमार करणारे दोघे व पीडित नऊ जणांना शेगाव रेल्वे पोलीस दलाच्या ताब्यात दिले. शेगाव रेल्वे पोलीस दलाने दोन्ही आरोपींविरुद्ध दरोडा टाकण्याचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ करुन जबर मारहाण करणे तथा जिवे मरण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. दुसरीकडे रेल्वे पोलीस अँक्ट १८९0 च्या कलम १२८ व १२९ नुसारही या दोन्ही आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे. हावडा-अमृतसर एक्सप्रेसमध्ये २३ सप्टेंबरच्या पहाटे १ ते ३.१५ च्या सुमारास ही घटना घडली. दुसरीकडे नाशिक येथील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळसह लगतच्या भागात रेल्वे सुरक्षा बलाने तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. त्या अनुषंगाने सतर्क असलेल्या मलकापूर हद्दीतील रेल्वे सुरक्षा बलाच्या या चमूने दोन्ही आरोपींना प्रसंगावधान राखून ताब्यात घेतल्यामुळे मोठा दरोडा तसेच लुटमार थोडक्यात वाचली, असे प्रवाशांमधून बोलले जात आहे. घटनेतील दोन्ही आरोपींना अपंगांच्या बोगीतून अवघे १६00 रुपये मिळाले असले तरी त्यांना केलेला प्रकार गंभीर होता. या घटनेने गांभीर्य वाढले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हावडा-अमृतसर रेल्वेत लुटमार; दोघांना अटक
By admin | Published: September 24, 2015 1:24 AM