अकोला : सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने हावडा व मुंबई सेंट्रल दरम्यान होळी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतल आहे. अप व डाऊन अशा मार्गावर ही गाडी चालविण्यात येणार असून, बहुतांश सर्वच मोठ्या स्थानकांवर ही रेल्वे थांबणार आहे. तथापी, मध्य रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसुल मिळवून देणाऱ्या अकोला स्थानकावर या होळी विशेष गाडीला थांबा नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार ०८८४३ हावडा-मुंबई सेंट्रल होळी विशेष एक्स्प्रेस २५ मार्च रोजी पहाटे ३ वाजता हावडा येथून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १७:३० वाजता मुंबई सेंट्रल स्थानकावर पोहोचणार आहे. तर ०८८४४ मुंबई सेंट्रल-हावडा होळी विशेष एक्स्प्रेस २८ मार्च रोजी १०:३५ वाजता मुंबई सेंट्रल येथून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी २०:०५ वाजता हावडा स्थानकावर पोहोचणार आहे. अप व डाऊन अशा दोन्ही मार्गावरील गाड्यांना खड़गपुर, टाटानगर, चक्रधरपुर, राउलकेला, झारसुगुड़ा, बिलासपुर, रायपुर, दुर्ग, गोंदिया, नागपुर, बडनेरा, भुसावल, अमळनेर, नंदुरबार, भेटस्थान, वापी आणी बोरीवली स्थानकांवर थांबा असणार आहे. परंतु अकोला स्थानकावर ही गाडी थांबणार नसल्याने आणखी एका होळी विशेष गाडीने हुलकावणी दिल्याची भावना अकोलेकर प्रवाशांमध्ये आहे.