-संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात परतीच्या पावसाने शनिवार दुपारपासूनच जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत होऊन बळीराजा संकटात पडला आहे.ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात पडून असल्याने ते सडले आहे. या अस्मानी संकटाने शेतकऱ्याच्या नाकी नऊ आणले आहे. दिवाळी सण तोंडावर असतांना निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे दिवाळ निघाले आहे. वर्षभर शेतात राब-राब राबून अथक परिश्रमाने पिकविलेले सोयाबीन, कपासी, तूर, मुग आदी पिकाचे परतीच्या पावसामुळे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहे. सोयाबीन व ज्वारी पिकाची काढणी सुरू असताना त्यावर धो-धो पाऊस आल्याने संपूर्ण पिके उध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात शनिवार पासून सतत पाऊस सुरू आहे. मध्यंतरी काही दिवस पावसाने सवड दिल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी, मका, कापूस, भूईमुग यांसारखी पिके काढणी सुरू असतांना पाण्याखाली गेली आहे. बहुतेक शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहे. आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हा हिरावल्याचे चित्र आहे. सोयाबीन, कापसाच्या बोंड्या पावसामुळे सडल्या आहे. शासनाने नुकसान ग्रस्तांची त्वरित पाहणी करून कृषी विभागाच्या व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करावे व प्रशासनाच्या वतीने दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
मूर्तिजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 6:20 PM