लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या काही शिक्षकांवर कारवाई केली जात नसताना, हुक्का पार्टीतील शिक्षकांवर कारवाई केल्यास, त्यांच्यावर अन्याय होणार असल्याचे सांगत, हुक्का पार्टीतील शिक्षकांच्या सर्मथनात जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत बुधवारी काही सदस्य चांगलेच सरसावले.पातूर रोडवरील एका ढाब्यावर हुक्का पार्लरमध्ये नशा करणार्या जिल्हा परिषद शाळांवरील १0 शिक्षकांवर पोलीस कारवाई करण्यात आली. हुक्का पार्टीत पोलीस कारवाई करण्यात आलेल्या संबंधित शिक्षकांना तातडीने निलंबित करण्याची मागणी, गत १८ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी केली. त्यानुषंगाने यासंदर्भात कारवाई करण्याचा आदेश शिक्षण सभापतींनी प्राथमिक शिक्षणाधिकार्यांना दिला होता. या पृष्ठभूमीवर बुधवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत हुक्का पार्टीतील शिक्षकांवर कारवाईचा मुद्दा तीन सदस्यांनी उपस्थित केला. एकीकडे काही शिक्षकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात नाही, तर दुसरीकडे हुक्का पार्टी प्रकरणात शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केल्यास, संबंधित शिक्षकांवर अन्याय होणार असल्याची भूमिका जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, शोभा शेळके व डॉ. हिंमत घाटोळ यांनी सभेत मांडली. हा मुद्दा शिक्षकांचा वैयक्तिक असून, यासंदर्भात कारवाई करताना विचार करण्याची मागणीही संबंधित तीन सदस्यांनी सभागृहात केली. त्यामुळे हुक्का पार्टीतील शिक्षकांच्या सर्मथनात तीन जिल्हा परिषद सदस्य उतरल्याचे चित्र जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत दिसत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, महिला व बालकल्याण सभापती द्रौपदा वाहोकार, कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, सदस्य दामोदर जगताप, विजय लव्हाळे, गोपाल कोल्हे, डॉ. हिंमत घाटोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जवादे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पडताळणी करूनच कारवाईचे आश्वासन!हुक्का पार्टी प्रकरणात शिक्षकांविरुद्ध कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल झाले, याबाबत पोलीस विभागाकडून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि पडताळणी केल्यानंतरच कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी सभेत दिले.