रवी दामोदर,अकोला : कट्टरवादी विचार समाजासाठी मारक ठरत असून, असे विचार समाजाचा विचार करीत नाहीत. त्यामुळे आजच्या युवकाने मानवतावादी होणे आवश्यक आहे. संतांचे मानवतावादी विचारच समाजासाठी पोषक असल्याचे मत गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती, अकोला शाखा व अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या उद्घाटन पर्वाला अध्यक्षिय भाषणात ते संबोधित होते.
शहरातील स्वराज्य भवनाच्या प्रांगणात दि. २३ डिसेंबर २५ डिसेंबर या कालावधीत संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. शनिवार, दि.२३ डिसेंबर रोजी महोत्सवाचे थाटात उद्घाटन पार पडले. या महोत्सवाला स्वागताध्यक्ष सम्राट डोंगरदिवे, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, उपसर्वसेवाअधिकारी दामोदर पाटील, उद्घाटक म्हणून वारी भैरवगडचे हभप. ज्ञानेश्वर महाराज वाघ, बालमुकुंद भिरड, बलदेवराव पाटील म्हैसने, राष्ट्रवादी (अजीत पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, महादेवराव भूईभार, सुखदास महाराज गाडेकर, इस्तिपाक अहमद यांच्यासह रवींद्र मुंडगावकर, आर. आय. शेख गुरुजी, डॉ. गजानन काकड, डॉ. त्र्यंबकराव आखरे आदींची उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक अॅड. संतोष भोरे, संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले, तर आभार श्रीकृष्ण सावळे गुरूजी यांनी मानले.शहरातून निघाली शोभायात्रा :
संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला शनिवार, दि.२३ डिसेंबर रोजी थाटात सुरुवात झाली असून, सर्वप्रथम राष्ट्रसंतांची श्री राजराजेश्वर मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विदर्भातून २० ते २५ दिंड्यांनी सहभाग घेतला होता. जैनचौक-सीटीकोतवाली, गांधीरोड असा प्रवास करून स्वराज्य भवन परिसरात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत गुरूदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सेवाधाऱ्यांनी सहभाग घेतला होता.