अकोला : ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे सध्या वातावरणात आर्द्रता वाढली आहे. वातावरणातील ही आर्द्रता बुरशीजन्य आजाराच्या फैलावासाठी पोषक असल्याने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांनी या दिवसांत स्वत:ला जपण्याची गरज आहे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत. सध्या कोरोनासोबतच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारानेही आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली आहे. कोरोना उपचारादरम्यान अनेकांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने जखळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून अनेक भागांत पाऊसही झाला. त्यामुळे वातावरणात आर्द्रता निर्माण झाली आहे. बुरशीजन्य आजारासाठी हे वातावरण पोषक असल्याने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांनी या दिवसांत अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवा
रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तीला बुरशीजन्य आजाराचा जास्त धोका असतो.
त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी आवश्यक प्रयत्न करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
त्यासाठी रुग्णांनी पोषक आहारासोबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक व्यायामही करणे आवश्यक आहे.
म्युकरमायकोसिस टाळण्यासाठी स्वच्छता आवश्यक
म्युकरमायकोसिस हा एक प्रकारचा बुरशीजन्य आजार आहे.
त्यामुळे नाक, डोळे आणि दातांची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे.
बुरशीजन्य आजारासाठी दमट वातावरण पोषक असते. अशा वातावरणात म्युकरमायकोसिसचाही फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी नाक, डोळे आणि दातांची नियमित स्वच्छता ठेवण्याची गरज आहे. डोळ्यात, नाकात किंवा दातामध्ये ठणक असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. पराग डोईफोडे, कान, नाक, घसातज्ज्ञ, अकोला