अकोला: महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये दोन महिलांचाही सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांना आरोपी केल्यानंतर या महिलांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवार, २८ मे रोजी ठेवण्यात आलेली सुनावणी ३ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे.स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद २०१४ पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. याच वादाच्या प्रकरणात सोमवार, ६ मे रोजी दुपारी १२ वाजता किसनराव हुंडीवाले न्यास नोंदणी कार्यालयात त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहीरे, दिनेश ठाकूर, प्रतीक दत्तात्रय तोंडे, मंगेश श्रीकृष्ण गावंडे व साबीर यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात येऊन किसनराव हुंडीवाले यांची हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर दीपाली छोटू गावंडे आणि अम्रिता प्रवीण गावंडे या दोन महिलांनाही आरोपी केले. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी २८ मे रोजी ठेवली होती; मात्र ती सुनावणी आता पुढे ढकलली असून, ३ जून रोजी यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. हुंडीवाले हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली असून, ते आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. काही आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.