अकोला : येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात शिक्षण संस्थेच्या वादातून समाजसेवी किसनराव हुंडीवाले यांची ६ मे रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील चार आरोपींनी द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता; परंतु मंगळवारी न्यायालयाने चारही आरोपींचा जामीन अर्ज नाकारला.प्रसिद्ध समाजसेवी किसनराव हुंडीवाले यांचे श्रीराम कचधन गावंडे यांच्यासोबत कौलखेड येथील शिक्षण संस्थेच्या कारभारावरून वाद सुरू होते. याबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयात खटला सुरू केला. ६ मे रोजी सकाळी किसनराव हुंडीवाले हे कार्यालयात आले. यावेळी या ठिकाणी माजी महापौर सुमन गावंडे यांचे पती श्रीराम गावंडे, त्यांची मुले रणजित गावंडे, प्रवीण गावंडे, छोटू ऊर्फ विक्रम गावंडे हेसुद्धा आले होते. त्यांंच्यात वाद झाल्याने गावंडे कुटुंबीयांनी किसनराव हुंडीवाले यांच्या डोक्यात अग्निशमन यंत्र घालून त्यांची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी दहा जणांना अटक केली होती. सध्या श्रीराम गावंडे, छोटू गावंडे व रणजित गावंडे हे कारागृहात आहेत. हत्याकांडातील तीन आरोपी फरार आहेत. दरम्यान, जिल्हा न्यायालयात प्रवीण ऊर्फ मुन्ना गावंडे, बादलसिंह राजपूत, प्रतीक दत्तात्रय तोंडे, मयूर गणेशलाल अहिर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्या न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. आरोपींना जामीन देण्यास सरकारपक्षाने विरोध केला. अखेर न्यायालयाने चौघाही आरोपींना जामीन नाकारला. (प्रतिनिधी)