अकोला: जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात शेकडो प्रकरणे यशस्वी तडजोडीने निकाली काढण्यात आली. फौजदारी, दिवाणी व कौटुंबिक प्रकरणे दोन्ही पक्षाच्या समजुतीने निकाली काढण्यात आली आहेत.राष्ट्रीय लोकन्यायालयाचे रविवारी देशभर जिल्हा व तालुकास्तरावर आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन. शिवराज खोब्रागडे यांच्या हस्ते न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ए.पी. कोकरे यांच्यासह सर्व न्यायाधीश, वकील उपस्थित होते. न्यायालयात दाखल व वादपूर्व प्रकरणांत लोकन्यायालयात समजुतीने तोडगा काढण्यात आला. यावेळी न्यायालयात समन्वयासाठी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एन. शिवराज खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात कामकाजास प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, दिवसभर अकोला न्यायालयासह जिल्ह्यातील सर्वच तालुका स्तरावरील न्यायालयात न्यायप्रविष्ट फौजदारी, दिवाणी अशी शेकडो प्रकरणे आपसात तडजोडीने मिटली. न्यायालयात दाखलपूर्व वीज वितरण कंपनीची प्रकरणे, बँकांची प्रकरणे, आर्थिक फसवणुकीची प्रकरणे, कौटुंबिक वाद, शेतीच्या वादाची प्रकरणे, अपघाती प्रकरणे, विम्याची प्रकरणे अशी प्रकारे सर्वच दिवाणी व फौजदारी प्रकरणे निघाली. लोकन्यायालय यशस्वीतेसाठी विधी सेवा समितीचे सचिव ए.पी. कोकरे प्रयत्नशील होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश (पहिले) मोनिका आयर्लंड, जिल्हा न्यायाधीश ए.एस. जाधव, न्यायाधीश व्ही.डी. केदार, न्यायाधीश डी.बी. पतंगे, न्यायाधीश डी.पी. शिंगाडे, न्यायाधीश एन.जी. शुक्ला व कोर्ट मॅनेजर अभिजित जनईकर, न्यायालय प्रबंधक अशोक लव्हाळे, अकोला बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. राहुल इंगळे, महिला उपाध्यक्ष अॅड. मुमताज देशमुख, अॅड. अनिल पाटील, अॅड. अनिल शुक्ला, अॅड. नितीन उंबरकर, अॅड. युसूफ नौरंगाबादी, अॅड. सी.एन. वानखडे, अॅड. भिसे, अॅड. मंगेश बोर्डे, अॅड. बदर, अॅड. संतोष खडसे यांच्यासह बहुसंख्येने संख्येने वकील, पक्षकार व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.