संजय खांडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळच्या वसाहतीमधील ८९0 उद्योगांना पाणी पुरवठा करणारे जलसाठे कोरडे पडत असल्याने शेकडो उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. धोक्यात सापडलेले उद्योग वाचविण्यासाठी आता एमआयडीसी प्रशासनाने परिसरातील विहिरी अधिग्रहणाच्या विचारात आहेत.विदर्भातील अनेक जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने पाण्याची भीषण समस्या उग्र रूप धारण करीत आहे. पावसाअभावी अकोल्यातील सर्वच जलसाठे कोरडेच आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत आता उद्योगांनाही झळ सोसावी लागत आहे. औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक उद्योगांसाठी मोठय़ा प्रमाणा त पाण्याची आवश्यकता असते. अकोल्यात लेबेन, टाटा रॅलीजसारख्या काही उद्योगांना पाण्याची नितांत आवश्यकता असते. पाण्याचा पुरेसा साठा न मिळाल्यास असे उद्योग बंद पडण्याची शक्यता असते. उन्हाळ्य़ात जाणवेल अशी स्थिती अकोल्यात पावसाळ्य़ातच निर्माण झाल्याने एमआयडीसी प्रशासन चिंतातुर झाले आहेत. औद्योगिक वसाहतीमधील ८९0 उद्योगांना कधीकाळी कुंभारी तलावातूनच पाणी मिळायचे. मात्र, उद्योगांसाठी राखीव ठेवलेल्या खांबोरा प्रकल्पातून एप्रिलपासून पाणी दिले गेले. पावसाने दडी मारल्याने, पाणी समस्या गंभीर झाली. त्यामुळे पिण्याचे पाणी राखून ठेवण्याच्या दृष्टीने ३१ ऑगस्टपासून खांबोरा प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा खंडित झाला. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने पुन्हा कुंभारी तलावा तून पाणी घेण्यास सुरुवात केली. मात्र, नोव्हेंबर १७ पर्यंंत पुरेल एवढाच जलसाठा या तलावात शिल्लक आहे. नोव्हेंबरनंतर अकोल्यातील उद्योगांना जिवंत ठेवणे कठीण झाले आहे. दोन दिवसाआधी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या बाबींवर सविस्तर चर्चा झाली. अकोल्यातील उद्योगांना जिवंत ठेवण्यासाठी आता काय नवी शक्कल लढविता येते, याकडे सर्वांंचे लक्ष लागून आहे. जर पुरेशा पाण्याचा साठा उद्योजकांना पुरविला गेला नाही, तर अकोल्यातील शेकडो उद्योग- कारखान्याला ताळे लागण्याची वेळ येऊ शकते. त्याचा प्रभाव अकोल्यातील इतर जोडधंदे आणि जनमाणसावरही होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनावर याआधी पावसाळ्य़ात पाण्याचे नियोजन करण्याची वेळ कधी आली नाही. त्यामुळे यासाठी भविष्यात आपत्कालीन बैठक बोलाविली जाण्याची वेळही नाकारता येत नाही. अकोलेकरांची तहान आणि उद्योगांना संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासन ही पाणी समस्या कशी सोडविते, याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.
गिट्टी खदानमधील पाण्याचाही उपयोगएमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी गिट्टी खदानीमध्ये पाणी साचले आहे. अनेक दिवसांचे साचलेले पाणी पिण्यायोग्य नसले, तरी बांधकाम आणि इतर कामासाठी त्याचा उपयोग शक्य आहे. टँकरने हे पाणी मिळविल्या जाऊ शकते. सोबतच एमआयडीसी तील हायड्रंट आणि इतर खासगी स्रोतावरही लक्ष केंद्रित करण्याच्या दिशेनेही विचार सुरू आहे.
औद्योगिक वसाहत परिसरात भरपूर पाणी असलेल्या चार विहिरी आहेत. यापैकी एक विहीर एमआयडीसीची असून, इतर विहिरी खासगी आहेत. या चारही विहिरींचे अधिग्रहण करून अकोल्यातील उद्योगांना जीवनदान देण्याचा प्रयत्न आमचा आहे. उन्हाळ्य़ातही उद्भवणार नाही, अशी स्थिती यंदा आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिग्रहणाचा प्रस्ताव तयार केला जातो आहे.- राहुल बन्सोड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी, अकोला.-