प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे व्हर्च्युअल प्रक्षेपण संपूर्ण राज्यभरात करण्यात आले. अकोल्यात हा प्रक्षेपण सोहळा रिंगरोडवरील जानोरकर मंगल कार्यालयात पार पडला. या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांच्या राजकीय व सामाजिक कार्याबाबत मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. सोहळ्यादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. यामध्ये माजी मंत्री गुलाबराव गावंडे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, प्रा. विश्वनाथ कांबळे, महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, रायुकाँ महानगराध्यक्ष करण दोड, माजी महानगराध्यक्ष अजय तापडिया, प्रा. विजय उजवणे, शेख अजीज भाई, माजी नगरसेवक पंकज गावंडे, फजलू पहेलवान, विशाल गावंडे, परिमल लहाने, विद्या अंभोरे, सुष्मा कावरे, भारती निम, महानगर युवती आघाडीच्या मेघा पाचपोर आदी उपस्थिती होती. या सोहळ्याच्या निमित्ताने प्रवेशद्वारावर अमृता सेनाड यांनी रांगोळीमध्ये साकारलेली शरदचंद्र पवार यांची आकर्षक प्रतिमा लक्ष वेधून घेत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अकोट शहराध्यक्षपदी ताज राणा यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आली. (फोटो)
----------------------------------
मी साहेबांपासून प्रेरणा घेतली, तुम्हीही घ्या - गुलाबराव गावंडे
या व्हर्च्युअल अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपणही एक वेळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, परंतु शरदचंद्र पवार ८०च्या वयात समाजकारण आणि राजकारणात एवढे सक्रिय राहून महाराष्ट्रासाठी झटत आहेत, हे पाहून त्यांच्यापासून प्रेरणा घेतली. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन समाजकारण व राजकारणात सक्रिय राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
----------------------------------
पवार साहेब देशाच्या राजकारणातील आदर्श- अमोल मिटकरी
पद्मविभूषण शरदचंद्र पवार हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे नेते आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. सर्व घटकांच्या विकासासाठी त्यांनी आजवर केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही. म्हणूनच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे, असे मनोगत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले.