आलेगाव वनपरिक्षेत्रातील शिरपूर परिसरात वृक्षांची सर्रास कत्तल करून वाहतूक केली जात असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २३ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करताच, आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांच्या आदेशानुसार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिरपूर परिसर पिंजून काढला असता, शेकडो हिरव्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत असल्याचे उघडकीस आले होते. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो हिरव्या वृक्षांची कत्तल झाल्याचे उघडकीस आल्यावर आलेगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांनी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वृक्षांची कत्तल झाली, त्या शेतकऱ्यांना नोटीस बजावली होती. परंतु दहा दिवसांचा कालावधी उलटूनही कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नाही. जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेले शिरपूर व बुलडाणा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेले शहापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून मन नदी वाहत आहे. आलेगाव वनपरिक्षेत्रअंतर्गत शिरपूर परिसरातील मन नदीच्या काठावरील शेतशिवरात हिरव्या मोठ्या निंबाच्या झाडांची कत्तल करून अवैध वाहतूक करण्यात येत आहे. याची माहिती वनविभागाला असूनसुद्धा वनभागाचे अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून होत आहे. शिरपूर परिसरातील मन नदीच्या काठावर असलेल्या शेतशिवारात भरदिवसा खुलेआम वृक्षतोड करून अवैध वाहतूक करीत आहे. त्यामुळे वन व महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वृक्षतोड माफियांना वन व महसूल विभागाचे अभय असल्यामुळे सर्रास वृक्षतोड सुरू आहे. शिरपूर परिसरात मोठमोठे निंबाची झाडे तोडून अवैध वाहतूक निर्धास्तपणे होत आहे. वृक्षतोड माफियांकडून सकाळीच मशीनद्वारे मोठ्या वृक्षांची कत्तल करून विल्हेवाट लावली जात आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात वृक्षतोड झाली आहे. त्यांना तलाठीमार्फत शेतकऱ्यांचे सर्व्हे नंबर माहिती करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
सतीश नालिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, आलेगाव
वनविभागाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ का?
आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयअंतर्गत शिरपूर, खेट्री, पिंपळखुटा, उमरा, राहेर, आडगाव, मळसूर, सायवणी, सुकडी, चान्नी, चतारी, चांगेफळ आदी परिसरात वृक्षांची सर्रास कत्तल होत आहे. परंतु आलेगाव वनविभागाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.