लोकमत न्यूज नेटवर्कआकोट / पोपटखेड : मेळघाटात दाखल झालेले पुनर्वसित गावकरी व अधिकार्यांमध्ये उशिरा रात्रीपर्यंत मागण्या पूर्ण करण्यावरून बैठक सुरूच होती. पुनर्वसित गावकरी मेळघाटात दाखल झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावात विखुरले होते. सकाळपासून बोलणी सुरू असल्यानंतर सायंकाळी दोन बसेसने आलेले ग्रामस्थ खटकाली- गुल्लरघाट गेटवर ठाण मांडून आहेत. अजूनही शेकडो ग्रामस्थ अधिकार्यांसोबत जुन्या केलपानी परिसरात चर्चा करीत आहेत. दरम्यान, मेळघाटमध्ये ठाण मांडून बसलेले अधिकारी व पुनर्वसित गावकर्यांच्या सोबत चर्चा करण्याकरिता आमदार बच्चू कडू हे रात्री खटकाली- गुल्लरघाट गेटमधून आतमध्ये गेले आहेत. दुसरीकडे प्रशासन व पुनर्वसित गावकर्यांत संघर्ष पेटू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर हे अकोटमध्ये दाखल झाले आहेत.त्यानंतर जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यात येतील. त्याकरिता प्रशासनाला काही दिवसांचा अवधी द्यावा, आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी आलो, तुम्हीसुद्धा सहकार्य करा, अशी विनंती करीत पुनर्वसित ग्रामस्थांचे मन वळविले. यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला अल्टिमेटम देत सहकार्याची भावना दर्शवित मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा मेळघाटात कायमस्वरूपी धडक देणार असल्याचे सांगितले. पुनर्वसित ग्रामस्थ हे मेळघाटात व गुल्लेरघाट गेटवर ठाण मांडून असून अधिकार्यांनीही मुक्काम केला आहे. दरम्यान, रात्री उशिरा आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी मेळघाट प्रकरणी पुढच्या आठवड्यात बैठक घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान, या पूर्वी माजी आमदार राजकुमार पटेल यांना मुख्य सचिव परदेसी यांनी मेळघाटात पाठवून ग्रामस्थांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसंदर्भात सांगितल्याने पटेल मेळघाटात पोहोचले होते. त्यानंतर रात्री उशिरा पुनर्वसित ग्रामस्थ व अधिकारी तेथून आपआपल्या गावी रवाना झाले.
मेळघाटात एस.टी. बसेस पोहोचल्या! मेळघाटात गेलेल्या पुनर्वसित ग्रामस्थांचे मन वळवून त्यांना परत आणण्याकरिता अकोला व अमरावती जिल्ह्यातील ३0-३५ एस.टी. बसेस सकाळपासूनच मेळघाटात गेल्या होत्या. या ठिकाणी ग्रामस्थ व प्रशासनात चर्चा झाल्यानंतर बसद्वारे ग्रामस्थांना पुनर्वसित गावांकडे परत आणण्यात येत होते. यावेळी बसमधील अन्नपूर्णा रायबोले या पुनर्वसित महिलेने शासन आमच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचे अधिकार्यांनी आश्वासन दिल्यामुळे आम्ही परत आलो असल्याचे सांगितले. केलपानी येथील काही ग्रामस्थांनी मात्र लेखी आश्वासनाचा हट्ट धरला होता. उशिरा रात्रीपर्यंत उर्वरित ग्रामस्थांचे मन वळविणे सुरू होते. या ठिकाणी महसूल व वन विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांची महत्त्वपूर्ण बैठक या विषयावर पार पडली.
किर्र अंधारात त्यांनी काढली रात्र!पुनर्वसित ग्रामस्थांनी मेळघाटातील आपल्या जुन्या गावाचा पल्ला पायदळ पार केला. या ठिकाणी किर्रर अंधारात निसर्गाच्या सान्निध्यात वन्य प्राण्यांची भिती न बाळगता रात्र काढली. तात्पुरत्या स्वरूपाच्या राहुट्यासुद्धा उभारल्या होत्या. यावेळी ग्रामस्थांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. काहींनी सोबत आणलेले भोजन घेतले. सकाळी प्रशासनाने त्यांना पोहे व केळीचा आहार दिला, तर काही ग्रामस्थांना उपवास घडला. १0 सप्टेंबर रोजी सकाळी पुनर्वसित गावातून काही लोक मेळघाटात गेलेल्यांसाठी जेवण घेऊन जात असताना त्यांना गुल्लरघाट येथे अडविण्यात आले. या ठिकाणी काही अधिकार्यांसोबत बाचाबाचीही झाल्याचे माणिक ब्रिंगणे, बालाजी सोनोने, भागवत मुंडे यांनी सांगितले.
आईजवळ बाळाला पाठविले! पुनर्वसित बारुखेडा येथील सुमलीबाई राजू वासकेला ही महिला आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला घरी ठेवून मेळघाटातील जुन्या गावात पायदळ गेली होती. याबाबतची माहिती तहसीलदार विश्वनाथ घुगे यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने तिचे नऊ महिन्याचे बाळ महसूल विभागाच्या वाहनामध्ये नायब तहसीलदार खेडकर यांच्यासोबत मेळघाटात बोलावून घेतले.
मेळघाटला छावणीचे स्वरूप मेळघाटमध्ये पुनर्वसित गावकरी परतल्यामुळे दोन दिवसांपासून मेळघाटातील गुल्लरघाट, पोपटखेड व व्याघ्र प्रकल्पातील परिसराला पोलीस व वन कमांडोच्या छावणीचे स्वरूप आले आहे. गुल्लरघाट गेटवर व रस्त्या-रस्त्यावर पोलीस, पोलिसांच्या वाहनांचा ताफा, बैठकीत प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. यावेळी अकोला, अमरावती जिल्ह्यातील पोलीस, एसआरपी, एच.टी.एफ. वनसंरक्षक दलाचे जवान तैनात होते. शासकीय अधिकार्यांची वाहने व एसटी बसेस या गेटवर चेक केल्यानंतरच आतमध्ये सोडण्यात आल्या. या व्यतिरिक्त कोणालाही परवानगीशिवाय प्रवेश देण्यात आला नाही.