जिल्ह्यासह महापालिका क्षेत्राला चक्रीवादळाचा फटका बसून नागरिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री अचानक आलेल्या वादळामुळे शहराच्या कानाकाेपऱ्यातील लहान-माेठे वृक्ष उन्मळून पडले. वृक्षांच्या भल्या माेठ्या फांद्या विद्युततारांवर काेसळल्यामुळे विद्युतपुरवठा खंडित झाला. शहरात सर्वत्र विद्युतखांब वाकून तारा लाेंबकळल्याचे चित्र आहे. या वादळामुळे सर्वाधिक नुकसान जुने शहरात झाल्याचे दिसून आले. दरम्यान, या नैसर्गिक संकटाचा मुकाबला करताना अग्निशमन विभागाची यंत्रणा ताेकडी पडली. झाडे ताेडण्यासाठी अकुशल व अपुरे मनुष्यबळ, वृक्ष कटाईच्या मशीनचा अभाव यामुळे प्रशासनाची यंत्रणा सैरभैर झाल्याचे चित्र हाेते. बुधवारी सकाळी मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी शहराच्या विविध भागांची पाहणी केली.
या भागात सर्वाधिक नुकसान
प्रभाग क्रमांक १ मधील सलामनगर, शिलाेडा, नायगाव आदी भागात नागरिकांच्या घरांवरील टिनाचे पत्रे उडून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला. राष्ट्रवादीचे नगरसेवक अब्दुल रहिम पेंटर यांच्या उपस्थितीत महसूल विभागाने सर्व्हेला प्रारंभ केला. त्यापाठाेपाठ प्रभाग क्रमांक ३ मधील खरप, न्यू तापडिया नगर, प्रभाग क्रमांक ८ मधील गजानन नगर, रावनगर, श्रद्धा काॅलनी, प्रभाग ९ मधील भगतवाडी, खैरमाेहम्मद प्लाॅट, आरपीटीएस राेड परिसरात वृक्ष पडल्याने घरांचे नुकसान झाले़.
वृक्ष उन्मळून पडले; नगरसेवक सरसावले!
जुने शहरातील जय हिंद चाैक, हरिहरपेठ, गाडगेनगर, साेनटक्के प्लाॅट, काळा माराेती परिसर यांसह मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्या निवासस्थानाच्या भागात अनेक माेठमाेठे वृक्ष उन्मळून पडले़. दरम्यान, शिवसेनेचे शहरप्रमुख तथा गटनेते राजेश मिश्रा यांच्या प्रभागात रात्री खंडित झालेला विद्युतपुरवठा बुधवारी दुपारी सुरळीत झाला. यावेळी राजेश मिश्रा यांनी क्रेनच्या साहाय्याने माेठे वृक्ष हटवले.
महापाैरांनी घेतला आढावा
शहरावर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीचा महापाैर अर्चना मसने, भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती संजय बडाेणे यांनी मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्याकडून आढावा घेतला. आगामी पावसाचे दिवस व संभाव्य नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता अत्यावश्यक साहित्याची खरेदी करण्याचे निर्देश महापाैरांनी दिले.