पातूर : पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या तांदळी येथील शेतकरी हरिदास रामभाऊ काळे यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, दि. १० फेब्रुवारी रोजी ८ वाजता उघडकीस आली. या प्रकरणात सावकाराने पैशांचा तगादा लावल्यानेच पतीने आत्महत्या केल्याची तक्रार शेतकऱ्याच्या पत्नीने पातूर पोलिसात दिली आहे.
तांदळी येथील शेतकरी हरिदास काळे हे दि. ९ फेब्रुवारी रोजी शेतात हरभरा पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते; मात्र ते घरी परतले नाही. त्यांच्या पत्नीने शेतामध्ये शोध घेतला असता ते मिळून आले नाही. बुधवारी सकाळी ८ वाजता शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मंगेश नामक युवकाने फोन करून दिली. या प्रकरणात मृतकाचे भाऊ गणेश रामभाऊ काळे यांनी पातूर पोलिसांत तक्रार दिल्यावरून पातूर पोलिसांनी तक्रारअर्ज दाखल केला; मात्र मृत शेतकरी हरिदास काळे यांची पत्नी मीरा काळे यांनी दि. १० फेब्रुवारी रोजी पातूर पोलीस स्टेशनमध्ये येऊन पतीला काही व्याजाने पैसे देणाऱ्या सावकारांनी पैशांचा तगादा लावल्यामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दिली. याप्रकरणात शवविच्छेदन अहवालानुसार पुढील तपास करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पातूर स्टेशनचे पोलीस निरीक्षक
हरीश गवळी यांनी दिली.