अकोला: बार्शीटाकळी तालुक्यातील बोरमळी येथील स्वाती राठोडची पतीने जाळून हत्या केल्यानंतर प्रथम जिल्हा व सत्र न्यायालयासमोर आलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हत्याकांडातील आरोपी पतीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीस २५ हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.बोरमळी येथील रहिवासी स्वाती किसनराव चव्हाण हिचा विवाह याच गावातील रहिवासी किरण गोपाल राठोड याच्यासोबतच २००७ मध्ये झाला होता. त्यानंतर राठोड दाम्पत्याला एक मुलगाही झाला; मात्र त्यानंतर दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद सुरू झाले. या वादातच २१ आॅगस्ट २०११ रोजी किरण राठोड याने पत्नी स्वातीला बेदम मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले. यामध्ये ८८ टक्के जळालेल्या स्वातीचा २७ आॅगस्ट रोजी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी स्वातीचा भाऊ दर्शन चव्हाण यांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा सासरा गोपाल रंगराव राठोड, सोनू राठोड, पूजा राठोड, गंगाराम राठोड, शंकर राठोड, गिरीधर राठोड, राजाराम राठोड व तिचा पती किरण राठोड यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८, ३०७ आणि ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका अर्नांल्ड यांच्या न्यायालयाने सहा साक्षीदार तपासल्यानंतर तसेच मृतक स्वातीच्या मृत्यूपूर्व बयानाच्या आधारे तिचा पती किरण राठोड याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. भाऊ व वडिलांचा साक्षमध्ये बदलया हत्याकांड प्रकरणात स्वातीचा भाऊ दर्शन व वडील या दोघांनी साक्ष देताना बदल केल्याचे तसेच साक्ष देण्यास नकार दिल्याचाही प्रकार घडला. स्वातीचा मुलगा तिच्या सासरीच राहत असल्याने तिचा भाऊ दर्शन व वडिलांनी साक्ष देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
स्वातीचा मृत्यूपूर्व बयानस्वाती ही ८८ टक्के जळाल्यानंतर तिचे शासकीय यंत्रणेसमोर मृत्यूपूर्व बयान घेण्यात आले होते. यामध्ये तिने तिचा पती किरण राठोड याचे त्याच्याच कुटुंबातील एका म्हिलेशी अनैतिक संबंध असल्याचे सांगितले होते. या अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळेच स्वाती व तिचा पती किरण यांच्यात वाद व्हायचे. याच कारणावरून वाद झाल्यानंतर किरणने स्वातीला बेदम मारहाण केली. यामध्ये स्वाती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर रॉकेल टाकून जाळण्यात आले.