अकोला: चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बांगरताटी येथील रहिवासी असलेल्या रिता दिनेश तिवारी या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीस सात वर्ष तर सासर्यास तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी सुनावली. दिनेश तिवारी असे तिच्या पतीचे नाव असून शिवप्रसाद तिवारी सासरे आहेत. बुलडाणा जिल्हय़ातील लोणार तालुक्यातील टिटवी येथील रहिवासी सत्यनारायण बद्रीप्रसाद उपाध्याय यांची बहीण रिता हिचा विवाह २00७ मध्ये चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बांगरताटी येथील रहिवासी दिनेश शिवप्रसाद तिवारी याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर रिता पहिल्या दिवाळीला माहेरी गेल्यानंतर तिला सासरच्या मंडळींनी ५0 हजार रुपयांची मागणी केली होती. या वादातून रिता व दिनेशला एक मुलगी झाली. त्यानंतर त्यांचा संसार रुळावर येत असतानाच आणखी वाद वाढला त्यामुळे रिता मुलीला घेऊन लोणार तालुक्यातील माहेरी राहायला गेली; मात्र त्यानंतर काही प्रतिष्ठितांनी त्यांच्यात मध्यस्थी केल्याने रिता पुन्हा बांगरताटी येथे पतीकडे राहायला आली रिताचे बंधू सत्यनारायण उपाध्याय यांनी चान्नी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून रिताचा पती दिनेश तिवारी व सासरा शिवप्रसाद तिवारी या दोघांविरुद्ध कलम ४९८ आणि ३0६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चान्नी पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने आठ साक्षीदार तपासल्यानंतर दिनेश तिवारी याच्याविरुद्ध समोर आलेल्या ठोस पुराव्यावरून कलम ३0६ अन्वये त्याला ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची तर सासरा शिवप्रसाद तिवारी याला ३ वर्षांंच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. पी. पी. नागरे यांनी काम पाहिले.
पतीला सात, सास-याला तीन वर्षांची शिक्षा
By admin | Published: July 01, 2016 2:06 AM