माना पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या मधापुरी येथे १८ मार्च २०१५ रोजी दारूच्या नशेत आरोपी संतोष मधुकर कुरडकर याने पत्नी रेखा हिच्यावर रॉकेल ओतून तिला पेटून दिले होते. दारूच्या नशेत हा प्रकार केल्यानंतर आरोपीला शुद्ध येताच विपरीत घडल्याचे लक्षात आले. त्यानंतर आरोपीने शेजाऱ्यांच्या मदतीने पत्नीला लागलेली आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत पत्नी रेखा ही ९६ टक्के जळाली होती. त्यामुळे आरोपीने पत्नीला तातडीने रुग्णालयात भरती केले. या घटनेची माहिती माना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपी संतोष मधुकर कुरडकरविरोधात भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. उपचारादरम्यान पत्नी रेखाचा मृत्यू झाल्याने कलम ३०३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश शयना पाटील यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत ८ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३०७, ३०२, ४९८ अ च्या आरोपातून मुक्त केले. तर कलम ३०४ पार्ट २ नुसार १० वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
पत्नीची जाळून हत्या करणाऱ्या पतीस दहा वर्षांचा सश्रम कारावास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 4:20 AM