नितीन गव्हाळे, अकोला : उगवा येथील शेतशिवारात ५० वर्षीय व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अकोट फैलचे ठाणेदार चंद्रशेखर कडू यांनी या प्रकरणात तपास करीत, आरोपीस बेड्या ठोकल्या. मृतक संबंधात अडथळा ठरत असल्याने, त्याच्या पत्नीनेच प्रियकराकरवी पतीचा काटा काढला, तसेच तिच्या मनात पतीमुळे तिच्या २० वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा रागही होता. असे तपासात समोर आले आहे.
उगवा शेतशिवारात ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर म़ृतक विद्यानंद बळीराम प्रधान याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीचा शोध सुरू केला. गुन्ह्याच्या तपासामध्ये सीसीटीव्ही फुटेज व सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात असलेल्या मिसिंग रिपोर्टच्या आधारे मृतकाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी मृतकाची पत्नी कंकुला प्रधान(४०)हिच्या २० वर्षीय मुलाने दोन वर्षांपूर्वी फाशी घेऊन आत्महत्या केली होती. मृतक विद्यानंद प्रधान याच्यामुळेच तिच्या मुलाने आत्महत्या केल्याचा राग तिच्या मनात होता. त्यामुळे ती विद्यानंदपासून वेगळी होत शिवणी येथे राहत होती. दरम्यान, तिची ओळख लकी श्रावण तेलंते(२४), रा. मोठी उमरी याच्यासोबत झाली. दोघेही शिवणी येथे भाड्याच्या रूममध्ये राहत हाेते. लकीसोबत तिचे संबंध प्रस्थापित झाले होते. कंकुला प्रधान हिने लकी तेलंते याला विश्वासात घेऊन पती विद्यानंद प्रधान याला जिवे मारण्यासाठी प्रोत्साहित केले. आरोपी लकी तेलंते याने मृतकाशी जवळीक साधून त्याला २४ सप्टेंबर २०२३ रोजी उगवा शेतशिवारात एका शेतामध्ये मृतकाच्या डोक्यावर, छातीवर व गुप्तांगावर वार करून त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले.
त्यामुळे पोलिसांनी आरोपी लकी श्रावणजी तेलंते, रा.मोठी उमरी याला अटक केली. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कारवाई अकोट फैलचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू, पीएसआय राहुल ठेंगणे, पीएसआय जगदीश जायभाये, पीएसआय देवीदास फुलउंबरकार, पीएसआय राजेश गोमासे, पोलिस कर्मचारी प्रशांत इंगळे, संतोष चिंचोळकर, जितेंद्र कातखेडे, असलम शहा, गिरीश तिडके, इमरान शहा, ओम बैनवाड, हर्षा बाटे, सुभाष सोळंके, सुनील खंडारे, रवी तेलगोटे, प्रमोद काकडे यांनी केली.असा उघड झाला गुन्हा
आरोपी लकी तेलंते याचे मृताच्या पत्नीसाेबत अनैतिक संबंध होते, तसेच पतीमुळे मुलगा मरण पावल्याचा राग मनात ठेवून पत्नी कंकुला प्रधान हिने पतीला ठार मारण्यास सांगितले होते. याची कुणकुण पोलिसांना लागली. पोलिसांनी तातडीने लकी तेलंते याला ताब्यात घेत, त्याची चौकशी केली असता, त्याने, गुन्हा केल्याची कबुली दिली.