अकोला: हायड्रोसिल आजाराच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी घेण्यात येणार्या शिबिरांसाठीच्या निधीला शासनाने कात्री लावली असून, गत तीन वर्षांपासून शासनाने हायड्रोसिल शस्त्रक्रियांसाठी निधीच दिलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात हायड्रोसिल शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन बंद पडले आहे. ५ व ६ मार्च रोजी पार पडलेल्या महाआरोग्य शिबिरामधून जिल्ह्यातील हायड्रोसिल आजाराने ग्रस्त ६७ रुग्णांची शस्त्रक्रियांसाठी निवड करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात हायड्रोसिल आजाराचे प्रमाण कमी असले तरी दरवर्षी रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये हायड्रोसिल आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या अधिक आहे. अमरावती जिल्ह्यात डोंगरी भाग असल्याने तेथे मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळून येतात. या जिल्ह्यात हायड्रोलसिल रुग्णांची संख्या ६00 च्या वर आहे. अकोला जिल्ह्यात हायड्रोसिलचे ३८६ रुग्ण आहेत. त्यापैकी अर्धेअधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हायड्रोसिल आजाराबाबत रुग्णांमध्ये अंधश्रद्धा असल्याने ते हा आजार लपवून ठेवतात. या आजाराचा त्रास काही नसला तरी मनात न्यूनगंड तयार होतो. त्यामुळे रुग्ण हायड्रोसिलचा उपचार करून घेण्यास सहसा तयार होत नाहीत. या आजाराबाबत आजूबाजूला माहिती होऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असतो. २0१४ मध्ये जिल्ह्यात हायड्रोसिलचे ३५0 रुग्ण होते. २0१५ मध्ये त्यात भर पडली आहे. हिवताप विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ३0 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी २७ केंद्रांतर्गत येणार्या परिसरात हायड्रोसिल आजाराचे रुग्ण आढळून येतात.
हायड्रोसिल शस्त्रक्रिया शिबिरांसाठी तीन वर्षांपासून निधीच नाही!
By admin | Published: March 10, 2016 2:25 AM