अकोला : कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे; परंतु ज्या बालकांच्या फक्त वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि तेच घराचा एकमेव आधार होते, अशा बालकांनी काय करायचे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्या अनुषंगाने कोरोनामुळे जिल्ह्यात वडिलांचे छत्र हरविले आणि पालक म्हणून केवळ आई असलेल्या जिल्ह्यातील ४५ बालकांना मदत कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती रुग्णसंख्य लक्षात घेता, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामध्ये कोरोनामुळे आई व वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्यांना (१८ वर्षांआतील बालकांना) मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे; परंतु ज्या बालकांच्या केवळ वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि तेच घराचा एकमेव आधार होते, अशा बालकांनी काय करायचे, कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरविल्याने पालक म्हणून केवळ आई असलेल्या बालकांना कोण आणि कोणती मदत करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे १८ वर्षांआतील ७४ बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ४५ बालकांच्या वडिलांचा आणि २९ बालकांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे आई व वडील दोघांचाही मृत्यू झालेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे केवळ वडिलांचे छत्र हरविल्याने पालक म्हणून आई असलेल्या जिल्ह्यातील बालकांना मदत कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण रुग्ण :
बरे झालेले रुग्ण :
सध्या उपचार सुरू असलेले :
एकूण मृत्यू :
२९ बालकांची आई; ४५ बालकांच्या
वडिलांचे हरवले छत्र!
कोरोनामुळे जिल्ह्यात ७४ बालकांनी पालकांचे छत्र हरवले आहे. त्यामध्ये ४५ बालकांनी वडिलांचे व २९ बालकांनी आईचे छत्र हरवले. त्यापैकी २६ मुले व १९ मुलींच्या वडिलांचा आणि १५ मुले व १४ मुलींच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
बालसंगोपन योजनेचा मिळणार आधार?
कोरोनामुळे आई किंवा वडील यापैकी एका पालकाचा मृत्यू झालेल्या बालकांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा आधार देण्यात येणार आहे. एकल पालक असलेल्या पात्र बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत दरमहा १ हजार १०० रुपयांप्रमाणे मदतीचा लाभ मिळू शकतो.
गृहचौकशीचा अहवाल
टास्क फोर्स बैठकीत ठेवणार!
कोरोनामुळे जिल्ह्यात ७४ बालकांनी पालक गमावले. त्यामध्ये ४५ बालकांच्या वडिलांचा आणि २९ बालकांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकल पालक असलेल्या जिल्ह्यातील ७४ बालकांची गृहचौकशी करण्यात आली असून, या चौकशीचा अहवाल जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी सांगितले.