संतोषकुमार गवई, पातूर : कोरोनापुढे सर्वच हतबल झाले आहेत. कोरोनासोबत दोन हात करून अनेक जण आयुष्य पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिस्थिती असो अथवा नसो. पोटच्या गोळ्यांना, कुटुंबीयांना वाचविण्यासाठी अनेकजण जिवाचे रान करीत आहेत. असाच प्रयत्न तांदळी येथील नाकट कुटुंबीयांनी केला. तांदळी येथील प्रांजल प्रभाकर नाकट हा आयएएस परीक्षा उत्तीर्ण युवक कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनामुळे फुप्फुस बाधित झाल्यानंतर सामान्य कुटुंबातील आई-वडिलांनी मुलासाठी नातेवाइकांच्या मदतीने ५५ लाख रुपये गोळा करून त्याला पुढील उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने हैदराबादला हलविले.
तत्पूर्वी हैदराबादच्या निष्णात डॉक्टरांनी अकोल्यात शस्त्रक्रिया करून प्रांजलला पुढील उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने हैदराबादच्या यशोदा हाॅस्पिटलला हलविले.
पातुर तालुक्यातील तांदळी येथील प्रांजलने जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि कठोर परिश्रमातून आयएसएस परीक्षाही पास केली. मात्र, गत आठवड्यात प्रांजलला कोरोनाची बाधा झाली. अकोल्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रांजलची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याच्या फुप्फुसावर कोरोनाने अटॅक केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक कृष्णाभाऊ अंधारे आणि आमदार अमोल मिटकरी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अकोल्याचे डॉ. सतीश गुप्ता यांच्या मदतीने हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलशी संपर्क साधला. तलाठी म्हणून कार्यरत प्रभाकर नाकट आणि आई अनुराधा नाकट यांच्या जिल्हाधिकारी होणाऱ्या प्रांजलच्या उपचारासाठी सत्तावीस लाख रुपये जमा करण्याचे आव्हान होते. अशा परिस्थितीत नातेवाइकांनी त्यांना साथ दिली आणि हैदराबादची डॉक्टरांची चमू सोमवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अकोल्यात पोहोचली. त्यांनी खासगी रुग्णालयात रात्रीच उपचार सुरू केले आणि प्रांजलला धोक्याबाहेर काढण्यात आणि तब्येत स्थिर करण्यात यश मिळविले. निष्णांत डॉक्टरांच्या चमूने पुढील उपचारासाठी प्रांजलला हैदराबादला हलविण्याचे सुचविले. यावेळी हेमलाता अंधारे आणि कृष्णा अंधारे यांनी नाकट परिवाराला बळ दिले. सोमवारी सकाळी नऊ वाजता अकोल्याच्या विमानतळावर प्रांजलला घेण्यासाठी एअर ॲम्बुलन्स दाखल झाली. सर्व प्रकारची पूर्वतयारी करून हैदराबादच्या पाच डॉक्टरांसह ॲम्बुलन्सद्वारे अवघ्या एका तासात हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलमध्ये प्रांजलला हलविण्यात आले.
नातेवाइकांच्या मदतीने ५५ लाख गेले गोळा!
सामान्य कुटुंबातील प्रभाकर नाकट, अनुराधा नाकट यांनी नातेवाइकांच्या मदतीने ५५ लाख रुपये जोडले. नुकतीच आयएएस परीक्षा पास झालेला प्रांजल कोरोनाशी झुंज देत आहे.
प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाअभावी अकोल्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाबाधित व नातेवाईक, कुटुंबीयांची खासगी कोविड सेंटर चालकांकडून केवळ आर्थिक लुबाडणूक होत आहे.