अकोला: जिल्ह्यात कोविडचा फैलाव झपाट्याने होत असल्याने सर्वोपचार रुग्णालयातील कोविडसाठी राखीव ४५० खाटा अपुऱ्या पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभाग फुल्ल झाला असून, कोविड वार्डातही ७८ खाटा शिल्लक असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे ऐनवेळी शेकडोच्या संख्येने रुग्ण वाढल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाची तारांभळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिस्थिती पाहता रुग्णालय प्रशासनातर्फे अतिरिक्त १०० खाटांचे नियोजन केले जात आहे, मात्र त्यासाठी आवश्यक खाटा अद्याप उपलब्ध झाल्या नसल्याने परिस्थिती गंभीर आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ४५० खाटा आरक्षित करण्यात आली आहेत. यापैकी तीस खाटा या अतिदक्षता विभागात आहेत. गंभीर अवस्थेत दाखल होणार्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने अतिदक्षता विभागही जवळपास फुल राहत आहे. शिवाय, ७० अधिक रुग्ण ऑक्सिजनवर असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. परिणामी कमी मनुष्यबळात रुग्णसेवा देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे इतर कोविड वार्डातही दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तुलनेत डिस्चार्जचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयावरील ताण वाढत आहे. मनुष्यबळाचा विचार केल्यास, आतापर्यंत कंत्राटी स्वरूपात ४४ परिचारिका आणि दोन तंत्रज्ञ सर्वोपचारला मिळाले असले तरी तज्ज्ञ डाॅक्टरांची प्रतिक्षा कायम आहे.
३० खाटांचे आयसीयू पॅक
सर्वोपचारमधील ३० खाटांचे कोविड आयसीयू पॅक झाले असून ऐनवेळी रुग्ण वाढल्यास कसरत करावी लागणार आहे. दरम्यान पर्यायी आयसीयूची तत्काळ व्यवस्थाही केली जाईल. मात्र मनुष्यबळ कुठून आणावे, हा प्रश्न प्रशासनासमोर आहे.
तज्ज्ञ २५ डाॅक्टरांची गरज
सर्वोपचार रुग्णालयावरील रुग्णसेवेचा ताण पाहता तज्ज्ञ २५ डाॅक्टरांची गरज आहे. आणखी आयसीयू सुरू करण्यासाठी इन्टेन्सिव्हिस स्पेशालिस्टची गरज आहे. मात्र सध्या ९ इन्टेन्सिव्हिस स्पेशालिस्टवर कारभार आहे. शिवाय भूलतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञ डाॅक्टरांचीही गरज आहे. तज्ज्ञ डाॅक्टरांच्या नेमणूकीसाठी शासनाकडे मागणी केली आहे. पण संपूर्ण राज्यातच मनुष्यबळाची कमतरता असल्याने डाॅक्टर्स कुठून मिळणार हा प्रश्न आहे.
रूग्ण होताहेत उशीरा दाखल
अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत उशीरा दाखल होतात. तर दूर्धर आजारामुळे काही रुग्णांमधील गुंतागुंत वाढलेली असते, अशा रुग्णांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. २४ तास तज्ज्ञांना अलर्ट राहावे लागते, असे अधिकारी सांगतात.