लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना उपचार मिळावे, तसेच बाहेरची दूषित हवा आणि जंतुसंसर्ग त्यांना होऊ नये, यासाठी अतिदक्षता विभाग (आयसीयू)ची दारे व खिडक्या नेहमी बंद असणे गरजेचे असते. सर्वोपचार रुग्णालयातील आयसीयू मात्र याला अपवाद ठरत असून, येथील आयसीयूची दारे सताड उघडी असतात. एवढेच नव्हे, तर या कक्षात कुणीही बिनदिक्कत जाऊ-येऊ शकत असल्यामुळे रोगजंतूंचा प्रादुर्भाव होऊन रुग्णांची प्रकृती सुधारण्याऐवजी ती अधिकच बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. यापैकी अनेक रुग्णांना विविध कक्षांमध्ये उपचारासाठी दाखल केले जाते. काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यास त्यांच्यावर विशेष उपचार करण्यासाठी त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले जाते. येथील १५ ते २० खाटांची क्षमता असलेला आयसीयू कक्ष नेहमी पूर्णपणे भरलेला असतो. अलीकडेच आयसीयूमधील वातानुकूलन यंत्र दुरुस्त करण्यात आले आहे. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती अत्यंत कमजोर असल्यामुळे त्यांना रोगजंतूंचा प्रादुर्भाव होऊ नये, याची दक्षता घेतली जाते. यासाठी आयसीयूची दारे व खिडक्या बंद असणे गरजेचे असते. तसेच बाहेरच्या व्यक्तींनाही आयसीयूमध्ये प्रवेश निषेध असतो. सर्वोपचारमधील आयसीयूमध्ये मात्र, या नियमांना बगल दिली जात असल्याचे चित्र आहे. आयसीयूची कवाडे सताड उघडी असल्याचे ह्यलोकमतह्ण चमूला सोमवारी दिसून आले. तसेच काही खिडक्याही उघड्या असल्याचे दिसून आले. खिडक्यांजवळच मोकळ्या जागेत घाण साचलेली आहे. या भागातून हवेद्वारे रुग्णांना जंतूसंसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. सर्वोपचार प्रशासनाचे मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.सर्वोपचारमध्ये रुग्णांचे हालसर्वोपचार रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात; परंतु, त्यांची येथे हेळसांड होते. रुग्णांची ने-आण करण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना पायी चालत जावे लागत असल्याचे सोमवारी दिसून आले. विझोरा येथील विलास इंगळे यांनी त्यांच्या गर्भवती पत्नीला येथे आणले; परंतु त्यांना स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर मिळाली नाही. शेवटी त्यांच्या पत्नीला पायीच वार्डापर्यंत जावे लागल्याचे ह्यलोकमतह्ण चमूला दिसून आले.सुरक्षा रक्षक नावालाच!आयसीयू बाहेर सर्वोपचार प्रशासनाने सुरक्षा रक्षक नियुक्त केला आहे. कुणीही आगंतुकाने आत प्रवेश करू नये, याची जबाबदारी या सुरक्षा रक्षकावर आहे; परंतु रुग्णांचे नातेवाईक किंवा इतर कुणीही थेट आयसीयूमध्ये प्रवेश करतात.
‘सर्वोपचार’च्या ‘आयसीयू’ची कवाडे सताड उघडी!
By admin | Published: June 27, 2017 10:15 AM