अकोला, दि. १८- शहरातील साफसफाईची गाडी रुळावर आणण्यासाठी महापौर विजय अग्रवाल व महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी समन्वय साधत पुढाकार घेतला. मनपाच्या आस्थापनेवर कार्यरत सफाई कर्मचार्यांची शनिवारी खुले नाट्यगृहात ओळख परेड घेण्यात आली असता, ७११ सफाई कर्मचार्यांपैकी १0८ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत सफाई कर्मचार्यांच्या माध्यमातून शहरातील प्रशासकीय प्रभागांमध्ये साफसफाईची कामे केली जातात, तर उर्वरित पडीत प्रभागांमध्ये कंत्राटदारांमार्फत नियुक्त केलेल्या कर्मचार्यांमार्फत दैनंदिन साफसफाईची कामे होतात. आस्थापनेवरील सफाई कर्मचार्यांची संख्या व त्यांना नेमून दिलेल्या परिसरात फेरफटका मारला असता, ठिकठिकाणी साचलेली घाण व कचरा आढळून येतो. सकाळी कामावर हजेरी दाखविली जात असली, तरी त्यानंतर मात्र सफाई कर्मचारी नेमके कोठे काम करतात, असा सवाल उपस्थित होतो. परिणामी, कचर्याची समस्या कायम असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या समस्येवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त अजय लहाने यांनी समन्वय साधत सफाई कर्मचार्यांची ओळख परेड घेण्याचा निर्णय घेतला. प्रभागनिहाय काम करणार्या सफाई कर्मचार्यांना शनिवारी खुले नाट्यगृहात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी ७११ सफाई कर्मचार्यांपैकी ५६६ कर्मचारी हजर होते. १0८ कर्मचारी गैरहजर आढळून आले, तर ३७ सफाई कर्मचारी रजेवर असल्याचे समोर आले. यावेळी उपायुक्त समाधान सोळंके, क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे, अनिल बिडवे, सहायक आरोग्य अधिकारी अब्दुल मतीन तसेच सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. ओळखपत्र आवश्यकप्रभागांमध्ये दैनंदिन साफसफाई करणार्या सफाई कर्मचार्यांना यापुढे ओळखपत्र आवश्यक आहे, तसेच प्रशासनाने निश्चित केलेला गणवेश घालूनच कर्मचार्यांना कार्यरत राहावे लागेल.
सफाई कर्मचा-यांची ओळख परेड; १0८ गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2017 2:52 AM