अकोला :-
मागील काही दिवसांपासून शहर वाहतूक शाखा अकोला शहरातील फटाके फोडणाऱ्या बुलेटविरुद्ध धडक मोहीम राबवित आहे. त्या अंतर्गत बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून फटाके फोडणारे सायलेन्सर लावून बुलेट चालविणाऱ्या बुलेट राजांना चाप लागावा म्हणून अशा बुलेटविरुद्ध धडक मोहीम सुरू करून गुरूवारी दुपारपर्यंत २५ बुलेट वाहतूक शाखेत लावून त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वाहतूक पाेलिसांनी यापूर्वी सुरू केलेल्या या माेहिमेत बुलेटचे सायलेन्सर बदलून घेऊन परत मूळ सायलेन्सर लावून मगच अशा बुलेट सोडण्यात येत होत्या. सदर मोहिमेचा काही अंशी फरक पडला, परंतु शहरात अजूनही बरेच तरुण एक क्रेझ म्हणून अशा फटाके फोडणाऱ्या बुलेट सुसाट वेगाने चालवित असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ह्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे निर्देशाप्रमाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सायलेन्सर बदलून फटाके फोडणाऱ्या बुलेटविरुद्धची मोहीम आणखी कडक करून आता अशा बुलेट आढळून आल्यास त्यांचेवर सरळ जप्तीची कारवाई करण्यास सुरवात केली आहे. अशा बुलेट वाहतूक कार्यालयात लावण्यात येणार असून त्यांचा अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाठवून त्यांची कारवाई झाल्यानंतरच त्यांचे निर्देशानंतरच अशा बुलेट सोडण्यात येणार आहेत.
काेट
अकोला शहरात अशा सायलेन्सर बदलून बुलेट चालविणाऱ्या तरुणांनी याची नोंद घ्यावी अन्यथा बुलेट जप्तीची कारवाईस तयार रहावे.
गजानन शेळके, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा