अकोला: कृषी महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एन्टर्नशीप करावी लागते. एका गावामध्ये दोन विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवून विविध उपक्रम राबविण्यास सांगितले जाते. घेतलेल्या उपक्रमाच्या वृत्तपत्रातून कमीत कमी तीन बातम्या छापून आल्यासच गुण दिले जातील, असे असे बंधनकारक करून कृषी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरले आहेत. त्यामुळे विद्यार्थी वृत्तपत्र कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहेत. कृषी महाविद्यालयांच्या या फर्मानामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्नित कृषी महाविद्यालयांमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेताना, एन्टर्नशीप करावी लागते. एन्टर्नशीप करताना, एका गावातील शेतकºयाची निवड करून दोन विद्यार्थ्यांना त्याच्याकडे प्रयोग राबविण्यासाठी पाठविले जाते. त्या शेतकºयाच्या शेतात केलेले प्रयोग, राबविलेले उपक्रम आणि कृषी महाविद्यालयांमध्ये घेतलेले उपक्रमाचे वृत्तांकन वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले तर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांचे गुण देण्याची अनोखी पद्धतच कृषी महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वर्षभर अभ्यास करून, दिलेल्या कार्यक्षेत्रावर काम करूनही विद्यार्थ्यांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत असल्यामुळे विद्यार्थीही वृत्तपत्रांमध्ये बातमी छापून आणण्यासाठी आग्रहाची भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे. वर्षभरात घेतलेल्या उपक्रमांच्या तीन बातम्या प्रकाशित झाल्या आणि त्याचे कात्रण विद्यार्थ्यांनी जोडले तर त्यांना गुण देण्याचा प्रकार शिक्षण पद्धतीमध्ये प्रथमच समोर आला आहे. फिल्डवरील केलेल्या कामाच्या, उपक्रमाच्या बातम्या छापून आल्या पाहिजेत. यासाठी विद्यार्थीसुद्धा आग्रही असतात. बातम्या छापून आल्या नाही तर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाचे गुण दिले जात नाहीत. कृषी महाविद्यालयांच्या या भूमिकेमुळे विद्यार्थी वेठीस धरले जात आहेत. (प्रतिनिधी)
रावेच्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या उपक्रमाच्या कमीत कमी तीन बातम्या प्रसिद्ध झाल्या पाहिजेत. यासाठी विद्यार्थ्यांना सांगितले जाते; परंतु विद्यार्थ्यांना हे बंधनकारक नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रावर काम करावे, हा त्यामागील उद्देश आहे.-डॉ. राम खरडे, प्राचार्य,सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय
रावेच्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांची एन्टर्नशीप करावी लागते. या एन्टर्नशीपदरम्यान दिलेले उपक्रम विद्यार्थी राबवितात; परंतु त्या उपक्रमांच्या बातम्या छापून आल्याच पाहिजे. याचे कोणतेही बंधन नाही. जे कार्यक्रम घेतले, ते विद्यार्थी त्यांच्या डायरीमध्ये नोंदवितात. त्यासाठी त्यांचा एक समन्वयकसुद्धा असतो. कार्यक्रमाच्या बातम्या छापून आल्या तरच गुण दिले जातील. हे चुकीचे आहे आणि विद्यापीठाने असे कोणतेही बंधन लादलेले नाही.-डॉ. श्यामसुंदर माने, सहयोगी अधिष्ठाताडॉ. पं.दे. कृषी महाविद्यालय