लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशाचे पहिले गृहमंत्री, पोलादीपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे राजकीय योगदान हा देश कधीच अव्हेरू शकणार नाही, मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे लोक सरदार पटेलांवर अन्याय झाल्याचा कांगावा करीत, गांधी-नेहरूंवर निशाणा साधतात. नेहरूजींना बदनाम करण्यासाठी सरदार यांच्या खांदा वापरताना, एकाच आरोपात गांधीजींनाही आरोपी करता येते, अशी त्यांची खेळी आहे. सरदार पटेल हे प्रखर देशभक्त होते. देशविघातक शक्तींना त्यांनी कधीच थारा दिला नाही. त्यांनीच संघावर बंदी घातली. महात्मा गांधींच्या हत्येला जबाबदार असलेल्या संघाला त्यांनी माफ केले नसते. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर त्यांना अवघे दोन वर्षांचे आयुष्य मिळाले. ते अधिक काळ जगले असते, तर संघाचे अस्तित्व तेव्हाच संपले असते, असा दावा प्रख्यात गांधीवादी व महात्माजींचे पणतू तुषार गांधी यांनी केला. त्यांनी सोमवारी ‘लोकमत’ कार्यालयात संपादकीय चमूसोबत संवाद साधला.
प्रश्न - सरदार पटेल यांच्या संदर्भात चुकीचा इतिहास सांगितला जातो का?उत्तर - अर्थातच! सरदार पटेल व महात्मा गांधी असोत, की नेहरूजी, यांच्या संदर्भाने सध्या जे विचार पेरले जातात, त्यामध्ये तथ्य कमी अन् राजकीय फायदा जास्त पाहिला जात आहे. सरदार पटेल यांची राजकीय उंची खूप मोठी आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अतुलनीय काम केले, यात कुणालाही शंका येता कामा नये; मात्र त्यांचा आधार घेऊन महात्माजी किंवा नेहरूजींना बदनाम केले जाते. यामध्ये राजकीय स्वार्थ आहे. सरदार पटेलांचे विचार घेण्यापेक्षा त्यांच्या मूर्तीमध्ये या लोकांना अधिक रस आहे. त्यातही ही मूर्ती कोणी उभारली, हे अधिक महत्त्वाचे ठरत असल्याने अशा प्रवृत्तींनी सुरू केलेल्या प्रचारामागील खरे स्वरूप स्पष्ट होते.
प्रश्न - असाच प्रचार भगतसिंग यांच्या फाशीबद्दल केला जातो?उत्तर - हो, गेल्या काही वर्षात अप्रचार करण्याचा ट्रेंडच निर्माण झाला आहे. शहीद भगतसिंग यांच्या फाशीबाबत महात्माजींनी ब्रिटीश सरकारशी केलेला पत्रव्यवहार हा आजही खुला आहे, तो वाचावा. भगतसिंग यांच्यासारखे युवक हे देशाचे भविष्य आहेत, त्यांना फाशीसारखी शिक्षा नको, अशी भूमिका महात्मा गांधी यांनी घेतली होती. त्याच दरम्यान काँग्रेसचे अधिवेशन होणार होते. या अधिवेशनात महात्मा गांधी कदाचित नव्या आंदोलनाची घोषणा करतील, अशी भीती सरकारला वाटल्याने त्यांनी नियोजित दिवसा आधीच भगतसिंग यांना फाशी दिली, हा इतिहास आहे. खरे म्हटलं तर महात्मा गांधी हे ‘काहीही करू शकले असते’ हा विश्वास देशवासीयांना असल्यामुळेच त्यांनी फाशी टाळली असती, या मतप्रवाहातून अपप्रचार केला जातो; वस्तुस्थिती तशी नाही.
प्रश्न- डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गांधीजी यांच्या संदर्भातही अपप्रचाराची शृंखला आहे, असे वाटते का?उत्तर - नक्कीच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गांधीजी हे दोन्ही द्रष्टे पुरुष होते. त्यांना काळाचे भान होते. या दोन नेत्यांमध्ये मतभेद जरूर होतेच, मात्र वैमनस्य नव्हते. त्यामुळेच संविधानाची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली पाहिजे, हा गांधीजींचा आग्रह होता. डॉ. बाबासाहेबांचे तर सरकारसोबतही मतभेद होते, म्हणून त्यांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा देऊन आपला बाणेदारपणा दाखविला होता. इतिहासात याचे पुरावेही आहेत; मात्र या दोन्ही महापुरुषांच्या भक्तांनी दोघांपैकी कोण मोठा, या स्पध्रेत अपप्रचाराला थारा दिला. त्यामुळे नव्या पिढीने इतिहास वाचून तथ्य समजून घ्यावे. या दोन नेत्यांचे कर्तृत्व मोठेच आहे. मतभेदाला वैमनस्याचे रूप देऊ नये.
प्रश्न- महात्मा गांधींच्या संदर्भातील अपप्रचाराला उत्तर देण्यास गांधीवादी कमी पडतात का?उत्तर - हो, दुर्दैवाने ते खरे आहे. सत्य हे शाश्वत आहे, या विचारावर गांधीवादी ठाम असतात; परंतु सत्य कितीही शाश्वत असले, तरी असत्याचा आवाज वाढला, तर खर्या विचारांचे बहिरेपण येते, हे गांधीवाद्यांना समजले नाही. याचा फायदा घेत असत्याचा गजर करण्याचे काम मोठय़ा प्रमाणात सुरू झाले आहे. त्यामुळेच गांधींची यथेच्छ बदनामी केली जात आहे.
प्रश्न- गांधीवादीच गांधी विचार समजण्यास कमी पडले का?उत्तर - गांधी ही जनतेची व्यक्ती होती. गांधी विचार हा सर्मथ व ताकदवान विचार आहे, ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ असे नाही, तर गांधीच सर्वांची मजबुरी आहे. त्यामुळे कधी काळी गांधी विरोधक असणार्यांना आता गांधी प्रात:स्मरणीय वाटत आहेत, हे गांधीजींची ताकद दर्शविते. हे गांधीवाद्यांना कळले नाही. त्यांनी गांधी चरखा, खादीमध्ये शोधला व त्यातच बंदिस्त केला. खुद्द गांधींनी सांगितले होते, की एकाच घटनेसंदर्भात माझे दोन विचार असतील, तर मी नंतर सांगि तलेला विचार योग्य माना! याचा अर्थ गांधी विचार हा ‘टाइमलेस’ आहे. या गांधीवाद्यांनी त्या विचारांना ‘टाइमबाऊंड केल्यामुळेच सारी गफलत झाली.
प्रश्न- पण, अलीकडे गांधी विचारांकडे नवी पिढी वळते आहे, असे वाटते का?उत्तर - हो, खरे आहे. ज्यांना-ज्यांना आपल्या भविष्याची चिंता वाटते ते-ते गांधी विचारांच्या आo्रयाला जातात. नवी पिढी चिकित्सक आहे. त्यांच्याकडे साधने मुबलक आहेत. अशा स्थिती त गांधी विचारांची नव्याने मांडणी त्यांना पसंत पडत आहे.
प्रश्न- आधी गांधींचा विरोध, आता गांधींची पूजा, अशा प्रवृत्तीबाबत काय सांगाल?उत्तर - गांधींचा विचार अंगीकारणे, त्यानुसार आचरण करणार्यांनी गांधींच्या प्रतिमेसमोर नतमस् तक होण्याचीही गरज नाही. पण, ज्यांना केवळ दाखविण्यासाठी गांधी हवा आहे, त्या प्रवृत्तींनी गांधींचा चेहरा घेत आपली प्रतिमा उजळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गांधींचे स्मरण ही त्यांची मजबुरी आहे; पण खरे म्हणाल तर गांधींना विसरलो तर आपण गांधींचा तोटा काहीच नाही. नुकसान देशाचे होईल. त्यामुळे मुखवटे पूजनापेक्षा विचारांचे पाईक होणार्यांची गरज आहे.
प्रश्न- गांधी हत्येची केस पुन्हा खुली करण्यास आपला विरोध का?उत्तर - हाती काय लागणार आहे? गांधीजींची हत्या झाली त्यावेळचे सगळे साक्षीदार, तेव्हाचे त पास अधिकारी कुणीही जिवंत नाही. या हत्येमधील पुरावे अनेक कसोटीवर खरे असल्याचे सिद्ध झाले आहे. मग, नवे काय शोधणार? मुळातच अशी मागणी करणार्यांना नवे शोधायचेच नाही, तर फक्त हत्येच्या कारणांबाबत संभ्रम निर्माण करून, हत्या कशी योग्य होती, हेच ठसवायचे आहे. नव्याने चौकशी झाली, तर कपूर कमिशनने काढलेले निष्कर्ष मागे पडतील. गांधी हत्येमध्ये सावरकरांचा हात व संघाचे सहकार्य होते हे सिद्ध झाले आहे, तेच यांना पुसून काढायचे आहे. इ ितहास बदलविण्याचा प्रयत्न करणार्या या प्रवृत्ती आहेत. त्यामुळे केवळ आपली विचारधारा थोपविण्यासाठी खटाटोप सुरू आहे. उद्या कदाचित असा प्रयत्न झालाच, तर मी माझी बाजू कायदेशीररीत्या लढेण.
प्रश्न - तुम्ही गांधींना संत समजता की राजकारणी?उत्तर - दोन्ही! गांधीजींनी मांडलेला विचार व त्यांनी समाजकारणातून उभारलेले राजकारण, या दोन्ही गोष्टी परस्परांशी निगडित आहेत. त्या वेगळया करता येत नाहीत; मात्र केवळ अंध भक्ती म्हणून मी गांधी विचारांकडे पाहत नाही. हा विचार कालातीत आहे. त्यामुळेच आजही जगभर गांधींची महती गायली जाते. त्यांच्या प्रशंसकांना गांधी हवाच आहे; पण विरोधकांनाही गांधी विचार अव्हेरता येत नाही. आजही प्रत्येक राजकीय आंदोलनामागे गांधी विचाराचे अधिष्ठान आहे. आज अकोल्यात यशवंत सिन्हा आंदोलन करीत आहेत. शांतीच्या मार्गाने त्यांनी सुरू केलेले आंदोलन गांधी विचारांचे दर्शक नाही का? त्यामुळे विचारांच्या समृद्धीने गांधी संत होतेच पण कुशल राजनितीज्ञही होते. म्हणूनच ते आजही तितकेच लोकप्रिय आहेत.
प्रश्न - चंपारण्य सत्याग्रहाला १00 वर्षे पूर्ण झाली. यावेळी आपण उपस्थित होता, शेतकर्यांची स्थिती इतक्या वर्षातही का बदलली नाही?उत्तर - दुर्दैवाने १00 वर्षांतही शेतीचे प्रश्न व शेतकर्यांची स्थिती कायमच आहे. यामागील कारणे शोधताना शेतीला नेहमीच दुय्यम स्थान दिल्याचे दिसून येते. देशाची प्रगती मोजताना उद्योगामधील प्रगती दाखविली जाते; मात्र शेतीमधील यश दाखविले जात नाही. या देशातील सर्वच सरकारांनी उद्योग क्षेत्राला प्राधान्य दिले. शेतीप्रधान असे म्हणायचे; मात्र सर्व-सोयी सवलती या उद्योगालाच मिळतील; अशीच धोरणे राबविली गेली. गांधीजी म्हणायचे खेड्याकडे चला, आपण मात्र खेड्यांनाच शहरे बनविण्याकडे लक्ष दिले. मूळ आशय विसरलो. त्यामुळेच खेड्यांची व पर्यायाने शेतीची अधोगती झाली. परदेशी पाहुणे आल्यानंतर त्यांना आपण विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती दाखवितो. शेतीची प्रगती का नाही दाखवत, हरित आणि श्वेत क्रांतीमधून आम्ही अन्न स्वयंपूर्ण त: प्राप्त केली; मात्र या क्रांतीच्या माध्यमातून शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यात अपयशी ठरलो. तेच चक्र अजूनही सुरू असल्याने आजही शेतकर्यांना आंदोलन करावे लागते. -