अकाेला: अकाेल्यातील धम्मचक्र प्रवर्तन साेहळा हा अतिशय महत्त्वाचा साेहळा आहे. काेराेना संकटामुळे हा साेहळा साधेपणाने साजरा करण्याबाबत प्रशासनाने भारतीय बाैद्ध महासभेला सूचना केली आहे; मात्र दरवर्षी मुंबई येथे हाेणारा शिवसेनेचा दसरा मेळावा झाला तर अकाेल्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा साेहळाही त्याच उत्साहात साजरा करू, असे इशारावजा पत्र भारतीय बौध्द महासभेच्या वतीने पाेलीस अधीक्षकांना २० ऑक्टाेबर राेजी दिले आहे.
भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष पी. जी. वानखडे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की २६ ऑक्टाेबर राेजी दुपारी मिरवणूक व संध्याकाळी जाहीर सभेचे नियाेजन आहे. त्यामुळे या काळात ध्वनिक्षेपक लावण्याची तसेच मिरवणूक व सभेची परवानगी देण्यात यावी. मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा झाला तर अकाेल्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा साेहळाही नियाेजनाप्रमाणे साजरा करण्याची तयारी आहे, असे स्पष्ट केले आहे. याबाबत खदान पाेलीस स्टेशनकडून ठाणेदारांनी पी. जे. वानखडे, एम. आर. इंगळे, गजाान थाेरात, विलास बाेराडे, रमेश गवई, डी. बी. शेगाेकार व राजेंद्र पाताेंडे यांना नाेटीस देऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाबाबत शासनाच्या निर्देशांची जाणीव करून दिली आहे.
दरम्यान, धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजनाबाबत भारतीय बौध्द महासभा, वंचित, महिला आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाची संयुक्त बैठक मंगळवारी पार पडली.