वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास बदलतील समीकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:23 PM2019-07-02T12:23:51+5:302019-07-02T12:26:25+5:30
वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस आघाडीमध्ये समावेश झाल्यास जिल्ह्यातील आघाडीच्या जागा वाटपाची घडी विस्कळीत होणार आहे.
अकोला: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या काँग्रेसच्या पराभवात वंचित बहुजन आघाडीने घेतलेली मते कारणीभूत ठरल्याचे समोर आल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस आघाडीमध्ये समावेश झाल्यास जिल्ह्यातील आघाडीच्या जागा वाटपाची घडी विस्कळीत होऊन अनेकांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागणार आहे. सद्यस्थितीत या दोन्ही पक्षांची राजकीय ताकद पाहता जिल्ह्यातील पाचपैकी प्रत्येकी एक मतदारसंघ काँग्रेस ,राष्टÑवादीकडे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर धडा घेत मतविभाजन टाळण्यासाठी वंचितसोबत आघाडीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अकोला जिल्हा हा अॅड. प्रकाश आंबेडकर यांची राजकीय राजधानी असून, सद्यस्थितीत काँग्रेसचा एकही आमदार जिल्ह्यात नसल्याने जागा वाटपात येथे वंचितची भूमिका वरचढ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात असलेल्या पाच मतदारसंघांपैकी बाळापूर हा मतदारसंघ वंचितच्या (भारिप-बमसं) ताब्यात आहे, त्यामुळे या मतदारसंघाबाबत वाटाघाटीचा प्रश्नच उद्भवणार नाही. उरलेल्या चार मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीत अकोला पूर्व या मतदारसंघात भारिप-बमसं दुसºया क्रमांकावर राहिला. विशेष म्हणजे मोदी लाटेतही येथे भारिपने ३०.३९ टक्के मते घेतली तर विजयी झालेल्या भाजपाला ३१.८४ टक्के मते होती. त्यामुळे साहजिकच या मतदारसंघावर वंचितचा दावा होणे अपेक्षित आहे. कदाचित राखीव जागा लढविण्याबाबत वंचित आग्रही राहिल्यास मूर्तिजापूर मतदारसंघाचा विचार केला जाऊ शकतो. येथेही गेल्या निवडणुकीत दुसºया क्रमांकाची मते घेतली होती. या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसची कामगिरी ही चवथ्या क्रमांकावर राहिली आहे. त्यामुळे बाळापूरसह मूर्तिजापूर व अकोला पूर्व अशा तीन मतदारसंघांवर वंचितचा दावा प्रबळ ठरू शकतो. असे झाल्यास काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसला अकोट व अकोला पश्चिम असे दोनच पर्याय शिल्लक राहू शकतात. त्यामुळे वंचितचा महाआघाडीत समावेश झाल्या निवडणुकीसाठी तयारी करीत असलेल्या काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसमधील इच्छुकांनाच उमेदवारीच्या संधीपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.
काँग्रेस सोबतच्या आघाडीबाबत अद्याप कुठलीही चर्चा कोअर टीममध्ये झालेली नाही. बाळासाहेब आदेश देतील तोच अमलात येईल. सध्या तरी आम्ही २८८ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे.
- अशोक सोनोने, प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी
काँग्रेसनेही उमेदवारी अर्ज बोलविण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. दुसरीकडे वंचितची काँग्रेससोबत आघाडी व्हावी अशा हालचाली पक्षस्तरावर सुरू झाल्या आहेत. अद्याप याबाबत अधिकृत चर्चा सुरू झाली नाही. चर्चेअंती याबाबत बोलता येईल. सध्या दोन्ही पक्ष आघाडीबाबत सकारात्मक आहेत.
- डॉ. सुधीर ढोणे, प्रदेश प्रवक्ते, काँग्रेस