लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाविकास आघाडीचे सरकार चांगले सुरू आहे, यात वाद नाही, हीच महाविकास आघाडी महापालिका निवडणुकीत कायम राहिली तर उत्तमच आहे अन्यथा सर्व ताकदीनिशी स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात लढू, त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे संपर्कमंत्री नामदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.
त्यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी अकोला महानगर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची आढावा बैठक झाली. यावेळी राज्य उपाध्यक्ष डॉ. संतोष दादा कोरपे, आमदार अमोल मिटकरी, महानगर अध्यक्ष विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, प्रदेश संघटक मोहम्मद रफीक सिद्दीकी मंचावर उपस्थित हाेते. डाॅ. शिंगणे म्हणाले की, आपण सत्तेत आहाेत त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याचा सन्मान राखला जाईल, असा प्रयत्न करा. जिल्हास्तरावरील समित्यांमध्येही राष्ट्रवादीचा वाटा निश्चितच कायम राहील, याची ग्वाही देताे तसेच अशासकीय समित्यांबाबत लवकरच निर्णय घेण्याबाबत संबंधितांशी चर्चा करताे, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रांरभी प्रास्ताविकामध्ये महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी अकाेला महापालिकेतीत सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर बाेट ठेवत आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचा महापाैर हाेईल, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. महानगरात राबविलेले विविध उपक्रम, आंदोलन व कार्यक्रम याबाबतची सविस्तर माहितीही सांगितली. या बैठकीला रवी राठी, मंदा देशमुख, नगरसेविका उषा विरक, माजी नगरसेविका सुषमा निचल, मनोज गायकवाड, अजय रामटेके, फैयाज खान, अब्दुल रहीम पेंटर, नितीन झापर्डे, माजी नगरसेवक दिलीप देशमुख, नकिर खान आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बुढन गाडेकर यांनी केले.