लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आव्हाने पेलण्याची क्षमता, परिo्रम, जिद्द, आत्मविश्वास, सातत्य, वेळेचा सदूपयोग यासोबतच संघर्ष करण्याची तयारी असेल तर केवळ यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षाच नव्हे, तर आयुष्याच्या कुठल्याही परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता, अशा शब्दात अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी विद्यार्थ्यांना यशाचा ‘पासवर्ड’ दिला. स्थानिक o्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात ‘लोकमत’ स्पर्धा परीक्षा लेखमालेचे प्रकाशन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर श्री. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष भडांगे, लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले, लोकमतचे सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी तब्बल दीड तास विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. ‘लोकमत’ ने समाजातील प्रत्येक घटकाचे भान सदैव ठेवले आहे. युवकांना भविष्य घडविण्याच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षा ही पर्वणी असते; त्यासाठी लोकमत सहाय्यभूत ठरत असल्याबद्दल त्यांनी कौतुक करीत, त्यांचे लोकमतसोबत असलेले ऋणानुबंध उलगडले. यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रत्येक गुणवंतासाठी यशाचे क्षितिज मोकळे आहे. प्रत्येकाला संधी आहे; मात्र ही संधी हस्तगत करण्यासाठी जिद्द हवी, अभ्यासात सातत्य असावे, मिळालेला प्रत्येक क्षण कसा सत्कारणी लागेल, याचे नियोजन असावे, असे ते म्हणाले. तरुणपणी प्रत्येकाजवळ प्रचंड ऊर्जा असते. या ऊर्जेचा वापर हा सकारात्मक व्हावा. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी या ऊर्जेला साधन म्हणून वापरता आले पाहिजे. चांगला क्लास नाही, मला मार्गदर्शन नाही, अशी ओरड करण्यापेक्षा आहे त्या साधनांचा सर्वाधिक वापर करता आला पाहिजे. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केला तर तो खूप महत्त्वाचा ठरतो, असे उदाहरणासह स्पष्ट केले. नव्या काळाशी सुसंगत असे बदल स्वीकारताना आपण स्वत:पासून बदल केला पाहिजे. अभ्यासाला शिस्त लावा, शिस्तीचे पालन करा, नियोजन करून ते प्रत्यक्षात येईल, यासाठी प्रयत्न करा, यश तुमचेच, असा मूलमंत्र जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे त्यांनी समाधान केले. प्रारंभी शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख व ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिवाजी महाविद्यालयाच्यावतीने जिल्हाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकार्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ भारत अभियानाची शपथ दिली. कार्यक्रमाला प्रा.डॉ. संजय खडक्कार, प्रा.डॉ. मोहन खडसे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.डॉ. संजय तिडके यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. संचालन लोकमतचे मुख्य उपसंपादक राजेश शेगोकार यांनी केले.
‘लोकमत’मधील स्तंभावर आधारित परीक्षेत प्रथम येणार्यास मोफत शिक्षणशिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक करून, हा स्तंभ विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या स्तंभामध्ये येणार्या माहितीवर आधारित परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेत प्रथम येणार्या विद्यार्थ्यास एक वर्षाचे शिक्षण मोफत व रोख रकमेचा पुरस्कार देण्याची घोषणा डॉ. भडांगे यांनी केली.