अकोला : शहरासह जिल्हाभरातील गोरगरीब रुग्ण मोठ्या आशेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात येतात; परंतु या ठिकाणी औषधांच्या तुटवड्यासोबतच इतर सुविधांच्या अभावांना सामोरे जावे लागते. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना औषधोपचार करण्यात कुचराई न करता त्यांच्याशी सौजन्याने वागा, अशा सूचना सर्वोपचार रुग्णालयाच्या अभ्यागत समितीचे अध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांनी शनिवारी दिले.सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा, कर्मचाºयांची अपुरी संख्या, स्वच्छतेचा अभाव आदी समस्या भेडसावत असल्याच्या पृष्ठभूमीवर खासदार संजय धोत्रे यांनी शनिवारी रुग्णालयास भेट देऊन आढावा घेतला. त्यांच्यासोबत आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे, तेजराव थोरात, महापौर विजय अग्रवाल, शहर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना डॉक्टर व इतर कर्मचाºयांकडून तुसडेपणाची वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. याविषयी बोलताना खासदारांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना सौजन्याने वागणूक देण्याच्या सूचना डॉक्टर व कर्मचाºयांना केल्या. या ठिकाणी येणारे रुग्ण ग्रामीण व आर्थिक दुर्बल घटकाचे असल्यामुळे त्यांच्या भावना समजून घ्याव्या, असे खासदारांनी सांगितले. यावेळी खासदारांनी रिक्तपदे, औषधांचा तुटवडा, चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांच्या समस्या, रुग्णांच्या समस्या अशा विविध विषयांचा आढावा घेऊन रुग्णालय प्रशासनाला मार्गदर्शक सूचना केल्या. या समस्या मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी ‘स्वच्छता हीच सेवा’ या सप्ताहाचा शुभारंभ खासदार धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला.
रुग्णालय परिसराची केली पाहणीयावेळी खासदार धोत्रे यांनी आमदार गोवर्धन शर्मा व आ. रणधीर सावरकर यांच्यासह इस्पितळाची पाहणी केली. परिसरातील अस्वच्छेतवर ताशेरे ओढताना स्वच्छता राखण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. घोरपडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नेताम, प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख, डॉ. सिरसाम, जयंत मसने, मोहन पारधी, संतोष काटे, रणजित खेडकर, राहुल देशमुख, गोकुळ पोटले, लोणकर आदी उपस्थित होते.वैद्यकीय शिक्षण सचिवांशी साधला संवाद!यावेळी खासदारांनी कर्मचाºयांचा पगार, औषध, यंत्रसामग्री व रिक्त जागांसंदर्भात तत्काळ अहवाल घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. समस्यांचे तातडीने निवारण करण्याची विनंतीवजा निर्देश खा. संजय धोत्रे यांनी दिले.