आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस - ५,२०,०३६
दोन्ही डोस - २,१४,९२१
कोव्हॅक्सिन - ५,४४,६२०
कोविशिल्ड - १,२०,६८०
कोविशिल्डचा त्रास अधिक
जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी नागरिकांना दिल्या जात आहेत. ज्यांनी कोविशिल्ड लस घेतली, त्यांना कोव्हॅक्सिनच्या तुलनेत जास्त त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. कोविशिल्ड लस घेतल्यानंतर बहुतांश लोकांना ताप येऊन गेल्याचे दिसून आले. या तुलनेत कोव्हॅक्सिन घेणाऱ्या क्वचितच लोकांना त्रास झाल्याचे दिसून आले.
लसीनंतर काहीच झाले नाही....
मी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला, मात्र मला कुठलाच त्रास झाला नाही. लस घेतल्यानंतर ताप येईल, अंगदुखीचा त्रास होईल, अशी भीती लस घेण्यापूर्वी होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. लसीकरण पूर्णत: सुरक्षित आहे. मी लस घेतली, तुम्हीही घ्या.
- महेश पाटील, नागरिक
माझे लसीकरण झाले आहे. लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास झाला नाही. थोडी कणकण जाणवली, मात्र काही तासांतच बरे वाटायला लागले. त्यामुळे लसीकरणाविषयीची मनातील भीती नाहीशी झाली. तुम्हीदेखील लस घेऊन कोरोनापासून स्वत:चे रक्षण करा.
- हेमंत देशमुख, नागरिक
त्रास झाला तरच परिणामकारक असे अजिबात नाही
प्रत्येकाच्या शरीराची परिणामकारकता वेगवेगळी असते. त्यामुळे लस घेतल्यानंतर कोणाला ताप येऊ शकतो, तर कोणाला नाही. याचा अर्थ लसीकरणानंतर त्रास झाला तरच लस परिणामकारक आहे, असे अजिबात नाही. दोन्ही लसी परिणामकारक असून, सुरक्षित आहेत. त्यामुळे नागरिकांनी संभ्रमात न राहता मिळेल ती लस घेऊन कोविडपासून स्वत:चे व आपल्या कुटुंबीयांचे रक्षण करावे.
- डॉ. वंदना वसो (पटोकार) , जिल्हा शल्य चिकित्सक, अकाेला