कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली, तरी रेल्वेची प्रवासी वाहतूक अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या असून, या गाड्यांमध्ये केवळ आरक्षित तिकिटांवरच प्रवास करता येतो. या गाड्यांमध्ये प्रवास करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आवश्यक आहे. आता कर्नाटक, गोवा, पश्चिम बंगाल, ओरिसा, राजस्थान या राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून ही एक उपाययोजना आहे.
कोरोना टेस्ट, लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक
प्रवाशांसाठी किमान ७२ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतलेल्या प्रवाशांनाही मुभा राहणार आहे. अशा प्रवाशांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागणार आहे.
सद्या अकोल्याहून धावत आहेत या गाड्या
अमरावती - मुंबई
लो.टी.ट. - हटीया
पोरबंदर - हावडा
हावडा - अहमदाबाद
नागपूर - कोल्हापूर
मुंबई - हावडा
पॅसेंजर गाड्यांची प्रतीक्षाच
कोरोना काळात सद्या केवळ विशेष गाड्या सुरू असून, या गाड्यांमध्ये आरक्षित तिकिटावरच प्रवास करता येतो. या गाड्यांचे तिकीट महाग असल्याने, सामान्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पॅसेंजर गाड्या सुरू व्हाव्या, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर पॅसेंजर गाड्या सुरू करणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. तथापि, अद्याप अकोलामार्गे एकही पॅसेंजर गाडी सुरू झालेली नाही.
मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण मिळेना
मध्य रेल्वेच्या मुख्य लोहमार्गावर असलेल्या अकोला येथून मुंबई व हावडाकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी असते. विशेषत: अकोल्याहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांमध्येही आरक्षण वेटिंगवरच असल्याचे चित्र आहे.
या गाड्या कधी सुरू होणार
भुसावळ - नरखेड पॅसेंजर
भुसावळ - वर्धा पॅसेंजर
अकोला - पूर्णा पॅसेंजर
अकोला - परळी पॅसेंजर