अकोला, दि. १८: रस्त्यावर खेळणार्या चिमुकल्यास धडक देऊन जखमी करणार्या मोटारसायकलस्वाराने सहानुभूती न दाखविता उलट चिमुकल्या मुलाच्या आईसोबतच मुजोरी करीत, धमक्या दिल्या आणि मोटारसायकलची नुकसान भरपाई मागण्याचा उपद्व्याप केल्याने जखमी मुलाच्या आईने जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना रविवारी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास घडली. गीतानगर परिसरातील भरतिया भवन रोडवर शर्विल इंगळे (३) हा चिमुकला खेळत होता. त्याला भरधाव आलेल्या एमएच ३0 एआर ४१८६ क्रमांकाच्या मोटारसायकलने धडक दिली. यात शर्विलच्या डोक्याला जखम झाली. मोटारसायकलस्वारही खाली पडला. यात त्याच्या मोटारसायकलचे नुकसान झाले. मुलाला जखम झाल्यानंतरही त्याच्या आईने सामंजस्याची भूमिका घेतली आणि दवाखान्याच्या खर्चही केला. घटना घडल्यानंतर थोड्या वेळाने पाच ते सहा युवकांना घेऊन महिलेचे घर गाठले आणि महिलेला धमक्या देत मोटारसायकलचे नुकसान झाले असून, त्याची भरपाई देण्याची मागणी केली. त्यामुळे महिला घाबरून गेली. पती घरी नसल्याने, तिने मोटारसायकलस्वार युवकाला नंतर येण्यासाठी सांगितले; परंतु युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर महिलेने पतीला फोन करून बोलावून घेतले आणि नागरिकांसह सायंकाळी जुने शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मोटारसायकल स्वाराविरुद्ध तक्रार नोंदविली आहे.
चिमुकल्यास धडक देऊन मोटारसायकलस्वाराची मुजोरी!
By admin | Published: September 19, 2016 2:47 AM