- पंकज सातपुते लोकमत न्यूज नेटवर्ककुरूम: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाकडून वृक्षारोपणासह संगोपनासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. वृक्षारोपणासह त्यांचे संगोपन व्हावे, यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी ग्रामपंचायतने अभिनव योजना सुरू केली आहे. पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करणाऱ्यांना दोन वर्षांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय राजनापूरच्या ग्रामपंचायतने घेतला आहे. वृक्षारोपण करून पाच वर्षे झाडे जगविणाºया ग्रामस्थांना ग्रामपंचायतचे सर्व दाखले मोफत देण्यात येणार आहेत तसेच त्यांच्या दोन मुलांच्या किंवा मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार आहे. महाराष्ट्र शासन वृक्ष लागवडीसाठी लाखो रुपये खर्च करते; परंतु लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी मोजकेच जगविले जातात. हे सर्व वृक्ष जगविण्याची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभाग व इतर प्रशासकीय विभागाची असते; परंतु वृक्ष लागवड झाल्यावर त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. याचा अभ्यास केल्यावर मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर ग्रामपंचायतने एक आगळा-वेगळा मार्ग शोधला आहे. हा आगळा-वेगळा उपक्रम वृक्ष लागवडीसाठी रोल मॉडेल ठरणार असून, राजनापूर ग्रामपंचायतने गावातील नागरिकांनी आपल्या परिसरात किंवा रस्त्याच्या कडेला जर पाच झाडे लावली व वृक्ष संगोपन केले तर त्याला दोन वर्षांचा घरकर पूर्ण माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान ग्रामसेवक संदिप गाडेकर यांनी सांगितले की, ग्रामपंचायतने केलेला हा उपक्रम एकदम चांगला आहे. यामुळे गावात हिरवळ राहील, जमिनीची धूप थांबेल. अनियमित पाऊस चांगला पडेल आणि या उपक्रमाने लोकांची सहभागाची भावना वाढेल.
पाच झाडे लावून संगोपन केल्यास घरपट्टी माफ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 2:38 PM