खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी मुख्यालयी मुक्कामी राहत नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे. गर्भवती महिला व बालकांच्या आरोग्यासाठी शासनाकडून विशेष योजना राबविल्या जातात; परंतु या ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्यांना वेळेवर येण्याची व मुख्यालयी राहण्याचे वावडे असल्याने या योजनांचा बोजवारा उडत आहे. रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याने रुग्णांना वार्यावर सोडल्याचे चित्र या रुग्णालयात पहावयास मिळते. डॉक्टर दुपारी १२ वाजेपर्यंत कर्तव्यावर पोहोचतात. तोपर्यंत रुग्णांना त्यांची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. त्यानंतरही उशिरा आलेल्या कर्मचार्यांकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप परिसरातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे. कर्मचार्यांच्या मनमानी कारभाराचा त्रास रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांनाही होतो. वरिष्ठ अधिकार्यांनी याची दखल घेऊन ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.
चतारी ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण वार्यावर अधिकार्यांचे दुर्लक्ष
By admin | Published: August 10, 2014 7:23 PM