शेतकऱ्यांच्या जमीन अकृषक न करता वीट व्यवसाय सुरू आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या वीटभट्ट्यांना पर्यावरण विभागाची परवानगी नसताना, महसूल प्रशासनाने मातीची रॉयल्टी दिली. त्यामुळे परवान्यापेक्षा कितीतरी पटीने मातीचे उत्खनन करून वीट व्यावसायिक शासनाचा महसूल बुडवित आहेत. याकडे महसूल अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सत्यपाल डोंगरे पारस यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्याने घेऊन वीटभट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे वीटभट्ट्यांची जागा अकृषक नाही. या भट्ट्या २० ते २५ एकर जागेत असल्याने जागेचे भाडे नाही. या वीटभट्ट्यांमुळे श्रीमती सिंधुबाई डोंगरे यांना धुळीच्या एलर्जीमुळे प्राण गमवावे लागले आणि त्यांच्या नातवालासुद्धा हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. त्यांच्या संपूर्ण घरात राख पसरत असून, स्वयंपाकघरातसुद्धा राख येत आहे. येथील वीटभट्ट्या लवकरात लवकर बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पालकमंत्री बच्चू कडू, उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, तहसीलदार डी.एल. मुकुंदे, ग्रामपंचायत सरपंच, सचिव पारस यांच्याकडे लेखी तक्रार करूनसुद्धा कारवाई करण्यात आली नाही. आता कारवाई न केल्यास १५ मेला पुढील दिशा ठरविण्यात येईल. असे सत्यपाल डोंगरे, रजनी मडावी, श्रीकृष्ण खंडारे, दीपक सावंत, विजय इंगळे, सुमित डोंगरे आदींनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बाळापूर तालुक्यात लोकवस्तीत अवैध वीटभट्ट्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:23 AM