महसूल विभागाचे दुर्लक्ष : लाखोंच्या महसूलला चुना
दिग्रस बु: पातूर तहसील अंतर्गत येत असलेल्या सस्ती परिसरात मातीचे अवैध उत्खनन सुरू असून, याकडे महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. दररोज शेकडो ब्रास उत्खनन करून अवैध वाहतूक होत असल्याने लाखो रुपयांच्या महसूलला चुना लागत असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सस्ती-दिग्रस मार्गावर असणाऱ्या वाघाडी नाल्यानजीक मातीचे अवैध उत्खनन सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही परिसरात मातीचे अवैध उत्खनन सर्रास सुरू आहे. तसेच याच नाल्यातून रेतीची चोरी करून अवैध वाहतूक जोमात सुरू आहे. महसूल विभागाला माहिती दिल्यानंतरही याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून होत आहे. माती व रेतीचे अवैध उत्खनन सुरू असल्याने नाल्यात खड्डे पडले असून, काठ खाली जात आहे. त्यामुळे नाल्याच्या काठानजीक असलेल्या शेतीला धोका निर्माण झाल्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत; मात्र महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सस्ती भागात रेती, मातीचे अवैध उत्खनन सुरू असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष द्यावे.
- सुनील बंड, ग्रा. पं. सदस्य सस्ती.
-----------------------------------------------
सस्ती परिसरात होत असलेल्या वाळूच्या अवेध उत्खननावर कारवाई करावी.
-सूरज झडपे, पंचायत समिती सदस्य पातूर सस्ती.
-----------------------------------
रात्रीस खेळ चाले...! सस्ती, दिग्रस परिसरात रात्रीच्या सूमारास रेतीची अवैध वाहतूक वाढली आहे. रेतीमाफियांकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाहतूक केल्या जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.