गजानन वाघमारे
बार्शीटाकळी : महसूल विभागाच्या दुर्लक्षतेमुळे तालुक्यातील काटेपूर्णा, मोर्णा नदीपात्रांतून व इतर नदी-नाल्यांतून हजारो ब्रास रेतीचा अवैध उपसा होत आहे. अवैध उत्खननामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.
तालुक्यातील दोनद, तामशी शिवारात काटेपूर्णा नदीपात्रातून व वाघाळीचा नाला, खटकाळीचा नाल्यातून दररोज हजारो ब्रास रेती चोरीला जात आहे. शासन दरबारी एक रुपया स्वामित्वधन भरले जात नाही, वसूल देखील केले जात नाही आणि कुठलीच कारवाई देखील महसूल अधिकारी, कर्मचारी करताना दिसत नसल्याचे चित्र आहे. तसेच वरखेड, वाघजाळी, सिंदखेड, सुकळी या शिवारातील मोर्णा नदीपात्रातून हजारो ब्रास रेतीचा उपसा करून अवैध वाहतूक सर्रास सुरू आहे. बार्शीटाकळी तालुक्यात काटेपूर्णा व मोर्णा या मोठ्या नद्यांसह इतरही लहान-मोठे नदी-नाले आहेत. पाणी ओसरल्यामुळे हजारो ब्रास वाळू उघडी पडली असून, रेतीचे अवैध उत्खनन करून तालुक्यातील बांधकामासाठी विकली जात आहे. गत वर्षभरात बोटावर मोजण्याइतपत कारवाई करण्यात आल्याने लाखोंच्या महसूलला चुना लागला आहे. (फोटो)
---------------------------
नदीपात्रात पडले खड्डे
तालुक्यातील नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले असून, यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात दिवसा रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
--------------------------
(तालुका प्रतिनिधी)
गौण खनिजाचे अवैध उत्खनन व चोरीसाठी महसूल विभागाने पथक नेमले असून, यामध्ये नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, त्या-त्या भागातील तलाठी व सहकार्याला पोलीस, आदींचा समावेश आहे. आजपर्यंत पथकाने तीन कारवाया मुरुम चोरी करणाऱ्याविरुद्ध केल्या आहेत. एकही कारवाई वाळू चोरांबाबत केलेली नाही.
- गजानन हामंद, तहसीलदार, बार्शीटाकळी.