अमोल सोनोने
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील अंधारसागवी परिसरात निर्गुणा नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा जोरात सुरू असून, दिवसाढवळ्या या रेतीची अवैध वाहतूकही होत आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे या अवैध वाळू वाहतुकीकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
येथून जवळच असलेल्या अंधारसागवी परिसरात रेतीची अवैध वाहतूक सुरू असून, परिसरातून वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांमध्ये रेतीची विक्री करण्यात येत आहे. जिल्ह्यात रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने रेती माफिया अव्वाच्या सव्वा दराने रेतीची विक्री करत असल्याचे पाहायला मिळत आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने निर्गुणा नदीपात्रात रेती माफियांकडून रेतीचा अवैध उपसा करून अंधारसागवी-चोंढी मार्गाने वाहतूक केली जात आहे. अंधारसागवी - चोंढी रस्त्याकडेलाच रेतीचे अवैध उत्खनन सुरु आहे; मात्र याकडे महसूल विभागाचे कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महसूल विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वाळू माफियांकडून दररोज शासनाला लाखो रुपयाचा चुना लावण्यात येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे. (फोटो)
----------------------------
वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात होते रेतीची विक्री!
अंधारसागवी हे गाव अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. त्यामुळे अंधारसागवी - मेडशी मार्गाने रेतीची अवैध वाहतूक होत असून, वाशिम जिल्ह्यात विक्री होत आहे. तसेच अंधारसागवी-डोणगाव मार्गाने बुलडाणा जिल्ह्यात रेतीची विक्री होत आहे.
---------------------------------
भरदिवसा अवैध वाहतूक सुरुच
निर्गुणा नदीपात्रातून भरदिवसा रेतीचा अवैध उपसा करून वाहतूक होत आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. लाखो ब्रास रेतीचा उपसा केल्या जात असल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
---------------------------
निर्गुणा नदापात्रातून होत असलेल्या अवैध उत्खननाची माहिती मिळाली असून, रेती माफियांवर कारवाई करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात येणार आहे. लवकरच कारवाई करण्यात येईल.
- दीपक बाजड, तहसीलदार, पातूर.