लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कीटकनाशकांच्या फवारणीमुळे बाधित झालेल्या शेतकर्यांची तातडीने दखल घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याबरोबरच फवारणीबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती करावी. तसेच शेतकर्यांना कुठल्याही प्रकारची अडचण भासू देऊ नये, अशा सूचना देतानाच पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बेकायदेशीररीत्या तथा प्रमाणित नसलेली कीटकनाशके विक्री करणार्या जिल्हय़ातील कृषी सेवा विक्री केंद्रांची तपासणी करून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी. ज्या तालुक्यांत अद्याप तपासणीची कार्यवाही झाली नसेल तेथे तातडीने तपासणी करावी. कीटकनाशक साठवणूक केले जाणारे गोडावून नियमितपणे तपासावेत असे निर्देश आज संबंधित अधिकार्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात पालकमंत्री यांच्या उपस्थितीत विविध विषयांबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त अजय लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक राजकुमार चौहान, आदींसह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.रासायनिक कीटकनाशकांमुळे विषबाधा झाल्याने मृत पावलेले शेतकरी तसेच बाधित झालेले शेतकरी याबाबत आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले की, कोणत्या कीटकनाशकांमुळे शेतकरी बाधित होत आहेत, याबाबत सखोल तपासणी करून त्या कीटकनाशक विक्रीवर बंदीची कार्यवाई करावी. कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत कार्यशाळांचे आयोजन करून मोठय़ा प्रमाणात जनजागृती करावी. बोगस बियाण्यांबाबतही दक्षतेने कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे कृषी यंत्रसामग्री खरेदीबाबत शेतकर्यांना कृषी अधिकार्यांनी मार्गदर्शन करावे. शेतकर्यांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात यावे. जिल्हय़ातील कृषी विभागाच्या इमारती सुस्थितीत व स्वच्छ असाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
अकोला शहरातील रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करा!अकोला : महानगरपालिकेमार्फत विविध योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांचा पालकमंत्री यांनी आढावा घेतला. टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौकापर्यंंतच्या सिमेंट रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, केंद्र शासन पुरस्कृत अमृत कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे, भुयारी गटार योजनेचे काम, अस्तित्वातील नळ पाणी पुरवठा योजनेचे बळकटीकरण, अकोला महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याबरोबरच मनपा शाळांच्या अद्यावतीकरणाची कामे तातडीने मार्गी लावण्याबाबत पालकमंत्री यांनी स्पष्ट सूचना दिल्या. महत्त्वाकांक्षी कापशी तलावाच्या सौंदर्यीकरणाचे रेंगाळलेले काम तातडीने पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले.सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामांचा पालकमंत्री यांनी आढावा घेतला. या विभागाकडे असणार्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी दिले. आरोग्य विभागाकडील कामांचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले, की शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासू देऊ नका, थॅलेसिमियासारख्या आजारांसाठी तातडीने १५ लाखांची औषधे खरेदी करण्यात यावीत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडेटिरियमच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावेत, एमआरआय मशीन खरेदीबाबतची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी, जिल्हाधिकारी यांनी यावेळी बैठकीला अनुपस्थित असलेल्या अधिकार्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून अशा अधिकार्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.