निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर परिसरात अवैध वृक्षतोड जोरात सुरू आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वनप्रेमींकडून होत आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पिंजर परिसरातील मोझरी खुर्द, खेर्डा खुर्द, सोनखास, पातूर, कारंजा रस्त्यावर वनविभागाच्या अखत्यारित आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या क्षेत्रामध्ये हिरव्या वृक्षांची कत्तल होत आहे. यामुळे पर्यावरणास हानी पोहोचत आहे. या गंभीर प्रकाराकडे वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. गत काही दिवसांपूर्वी भेंडी (काजी) शिवारात वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे. वृक्षतोड करीत असताना क्रेन मशीन, जेसीबी आणि दोन ट्रकचा वापर होत असल्याची माहिती आहे. गत अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून, याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन वृक्षतोड करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे. (फोटो)
---------------
पिंजर परिसरात अवैध वृक्षतोड होत असेल तर मी स्वत: पाहणी करून चौकशी करतो. वृक्षतोड करणाऱ्याविरुद्ध कारवाई करून अवैध वृक्षतोड थांबविली जाईल.
-डांगे, आरएफओ, बार्शीटाकळी