अकोला: येवता येथील खदान क्षेत्रात शासकीय जमिनीवर गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणाºया तीन ‘जेसीबी मशीन’ आणि गौण खनिजाची (मुरुम) अवैध वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त करीत, जेसीबी व ट्रक मालकांना २१ लाख रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकाºयांनी मंगळवारी पहाटे केली.जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांच्या नेतृत्वात जिल्हा आकस्मिक धाड तपासणी पथक सोमवारी रात्री गस्तीवर असताना, मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अकोला तालुक्यातील येवता येथील खदान क्षेत्रात शासकीय जमिनीवर तीन जेसीबी मशीनद्वारे अवैध उत्खनन आणि तीन ट्रकद्वारे गौण खनिजाची (मुरूम) अवैध वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. गौण खनिजाचे अवैध उत्खनन करताना आढळून आल्याने संजय पवार, अजय तायडे व राम जाधव यांच्या मालकीच्या तीन जेसीबी मशीन आणि गौण खनिजाची अवैध वाहतूक करताना आढळून आल्याने, एमएच ०४ डीके -६०९९, एमएच ४०-६९८५ व एमएच ३२ क्यू-२३२५ इत्यादी क्रमांकाचे तीन ट्रक जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या तीन जेसीबी मालकांना प्रत्येकी ५ लाख रुपये व तीन ट्रक मालकांना प्रत्येकी २ लाख रुपये असा एकूण २१ लाख रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी सांगितले.खदान क्षेत्रात रात्रीच्या वेळी सुरू होते उत्खनन!खदान क्षेत्रात सूर्यास्तानंतर गौण खनिजाचे उत्खनन करता येत नाही; परंतु येवता येथील खदान क्षेत्रात शासकीय जमिनीवर तीन जेसीबी मशीनद्वारे रात्रीच्या वेळी गौण खनिजाचे अवैध उत्खनन करण्यात येत असल्याचे आढळून आले, असे जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी सांगितले.