लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेतील कर्मचार्यांना पाच ते सहा महिन्यांपर्यंत वेतन मिळत नसतानाही येथील कर्मचार्यांनी अवैध सावकारी जोरात सुरू केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या अवैध सावकारी करणार्या कर्मचार्यांना लवकरच पोलीस ठाण्यात हजर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, त्यांचे बयान नोंदविण्यात येणार असल्याची माहिती आहे.महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने येथील कर्मचार्यांना दर महिन्याचे वेतन वेळेत मिळत नाही. उदरनिर्वाहाचे कारण समोर करून वेतन मागण्यासाठी वारंवार आंदोलन करण्यात येते. मात्र, वस्तुस्थिती काही वेगळीच असून, येथील कर्मचार्यांना वेतन वेळेत मिळत नसतानाही त्यांची अवैध सावकारी मात्र कोट्टय़वधींच्या घरात असल्याचे पोलीस तक्रारीतून समोर आले आहे. असेच एक त्रस्त झालेले सेवानवृत्त कर्मचारी गजानन झारकर यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाणे गाठून महापालिकेतील कर्मचारी व त्यांचे बाहेरील साथीदार, अशा १४ जणांविरुद्ध अवैध सावकारी अधिनियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. या कर्मचार्यांनी बेहिशेबी मालमत्ता गोळा केली असून, त्यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी तक्रारीतून केली आहे. सिटी कोतवाली पोलिसांनी आता अवैध सावकारी करणार्या कर्मचार्यांना ठाण्यात हजर होण्याचे निर्देश दिले असून, त्यांचे लवकरच लेखी बयान घेण्यात येणार आहे. या कर्मचार्यांचे बयान नोंदविल्यानंतर त्यांची वेतनाची व अन्य चौकशी आयकर विभागाकडून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या अवैध सावकारी करणार्या कर्मचार्यांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा उपनिबंधक कार्यालय झोपेत!अवैध सावकारी करणार्या महापालिकेतील कर्मचार्यांची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र, तालुका उपनिबंधक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला या विषयाशी देणे-घेणे नसल्याच्याच तोर्यात ते वावरत आहेत. केवळ ‘मलाई’ मिळणार्या प्रकरणात छापेमारी आणि कारवाईचा गाजावाजा करणार्या या विभागाच्या अधिकार्यांनी या गंभीर प्रकरणात मात्र अद्यापही लक्ष घातलेले नाही. अवैध सावकारीची तक्रार करणार्या व्यक्तीची तक्रारही या कार्यालयात घेतल्या गेली नसल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.