- आशिष गावंडे
अकाेला: महापालिकेत सामील झालेल्या हद्दवाढ क्षेत्रातील खासगी मालमत्तांवर अवैधरित्या कब्जा करून त्यावर केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास याेजनेच्या माध्यमातून घरकूल उभारण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे धक्कादायक प्रकार उजेडात आले आहेत. ‘पीएम’आवासचा लाभ घेण्यासाठी बनावट दस्तऐवज सादर केल्या जात असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. यामध्ये मागील अनेक वर्षांपासून गाव साेडून मनपा क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या जागांवर अनधिकृत कब्जा करण्यात आल्याची माहिती आहे.
शहरालगतच्या गावाचा महापालिकेद्वारे पुरविल्या जाणाऱ्या मुलभूत साेयी सुविधांवर ताण पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१५ मध्ये मनपाच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला हाेता. यामध्ये १३ मुख्य ग्रामपंचायतीमध्ये सामील २४ गावाचा समावेश हाेता. या २४ गावामध्ये अवघ्या १०० ते १४० लाेकसंख्येचा समावेश असलेल्या काही लहान गावाचा समावेश हाेता. दरम्यान, हद्दवाढ हाेऊन चार वर्षांचा कालावधी हाेत असला तरी या भागात अद्यापही मुलभूत साेयी सुविधांची पूर्तता नसून या भागात पाेहाेचण्यासाठी धड रस्तेही नसल्याची परिस्थिती आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या वाकापूर, सुकापूर, नायगाव, प्रभाग ८ मधील डाबकी, प्रभाग १८ मधील हिंगणा बु.,अकाेली खु., आदी भागाचा समावेश आहे. अशा भागातून मागील काही वर्षांपूर्वी शहरात वास्तव्यास आलेल्या मालमत्ता धारकांच्या जमिनींवर स्थानिक रहिवासी अतिक्रमण उभारून कब्जा करीत असल्याचे प्रकार समाेर आले आहेत. अवैध जागेवर घरकूल उभारण्यासाठी तसेच मालमत्तेत नावाची नाेंद करण्याच्या उद्देशातून टॅक्स विभागात बाेगस कागदपत्रे सादर केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
कर वसुली लिपिकांची सतर्कता
खासगी मालमत्तेवर अवैधरित्या ताबा घेऊन त्यावर घरकूल बांधणे किंवा मालमत्तेची स्वत:च्या नावावर नाेंद करून घेण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली जात असल्याची बाब पश्चिम झाेनमध्ये कार्यरत काही कर वसुली लिपिकाच्या निदर्शनास आली आहे. लिपिकानी सतर्कता दाखवत असे प्रस्ताव फेटाळून लावल्याची माहिती आहे.
हद्दवाढ क्षेत्रात मालकीचे खुले भूखंड असतील तर त्यांना मालमत्ता धारकांनी तारेचे कुंपण करावे. जागा बळकावण्याचा प्रयत्न केला असेल तर आमच्याकडे रितसर तक्रारी कराव्यात. नागरिकांनी सतर्क हाेण्याची गरज आहे.
-विजय पातरवार कर अधीक्षक,मनपा