लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मोहम्मद अली रोड परिसरातील दुकानामध्ये बुधवारी रात्री उशिरा दुकानाचे कुलूप तोडून गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी दुकानाचा बेकायदा ताबा घेतल्याची तक्रार अ. हबीब यांनी केली, तर मंजूर इलाही खान महम्मद खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या दूकानाबाबत न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला असून, अ. हबीब यांनी स्वत:च दुकान रिकामे करून दिल्याचे त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. अब्दुल हबीब अब्दुल सलाम (६0) आणि मंजूर इलाही खान महम्मद खान या दोघांमध्ये मोहम्मद अली रोडवर हैदराबाद येथील शब्बीरभाई कादरभाई यांचे बेरार सोडा फॅक्टरी नावाच्या दुकान मालकीवरून दिवाणी न्यायालय व मुंबई येथील न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयाने मंजूर इलाही यांच्या बाजूने निकाल दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या निकालानंतर मंजूर इलाही यांनी त्यांचे दुकान रिकामे करून देण्यासाठी अ. हबीब यांना सांगितले होते, त्यानुसार हबीब यांनी बुधवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान स्वत:च दुकान खाली करून दिल्याचे मंजूर इलाही यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पैशासाठी हबीब हे खोट्या तक्रारी करीत असल्याचे मंजूर इलाही यांचे म्हणणे आहे. तर अ. हबीब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे दुकान रात्री ३ वाजता जबरदस्तीने गुन्हेगारांनी खाली केले आहे. दोन्ही गटाकडून परस्पर तक्रारी करण्यात आलेल्या असून, पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान या प्रकरणात दूकान रिकामे करण्याची प्रक्रिया सीसी कॅमेर्यात कैद झालीआहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास करायला हवा, न्यायालयाने विरोधी गटाच्या बाजूने निकाल दिलेला असेल तर त्यांनी गुंडांचा वापर करून अशा प्रकारे रात्रीच्या दरम्यान हातात शस्त्र घेऊन दुकान खाली करण्याची प्रक्रिया चुकीची असल्याचे स्पष्ट होत आहे.
ताबा घेण्याची प्रक्रिया चुकीचीन्यायालयाने दुकान मालकाच्या बाजूने निकाल दिला असला तरी दुकानाचा रात्री ताबा घेण्याची प्रक्रिया चुकीची असल्याची माहिती एका ज्येष्ठ विधिज्ञाने दिली. न्यायालयाच्या निकालानंतर दिलेल्या कालावधीत दुकान रिकामे न केल्यास न्यायालयात ऑर्डर २१ रूल २२ नुसार याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे, त्यानंतर न्यायालय निर्णय देइल त्यानुसार दुकानाचा ताबा मिळविता येतो; मात्र रात्रीच्यावेळी जबरदस्तीनेदुकान खाली करण्याचा पर्याय नसून, ही प्रक्रिया चुकीची आहे.
मी माझे दुकान स्वत: रिकामे केले नाही. रात्रीच्यावेळी दुकान खाली करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. बुधवारी रात्री ३ च्या दरम्यान गुंडांचा वापर करून माझे दुकान रिकामे केले आहे. न्यायालयाने माझ्या विरोधात निकाल दिलेला आहे की नाही, या संदर्भात पूर्ण माहिती नाही; मात्र अशा प्रकारे दुकान खाली केल्यामुळे मी तणावाखाली आहे. - अ. हबीब अ. सलाम-