अकोला : मुदत संपुष्टात आल्यानंतरही अकोला महापालिकेने वाहनतळाच्या कंत्राटी निविदा न काढल्याने महानगरातील विविध ठिकाणची १२ वाहनतळे बेवारस आहेत. पूर्वीचे कंत्राटदारी या वाहनतळांवर अनधिकृत ताबा कायम ठेवत अकोलेकरांचा खिसा कापत आहे. तर दूसरीकडे महापालिकेचा १३ लाख ६४ हजारांचा महसूल बुडत आहे.अकोला महापालिका अतिक्रमण विभागांतर्गत मूलचंद पार्क-टिळक पुतळ्याजवळ (मनपा आवारभिंतीलगत), खुले नाट्यगृह-जवाहरलाल बागेपर्यंत, जनता भाजी बाजार कॉम्प्लेक्ससमोर, एसीसी क्रिकेट क्लबसमोर-एईएन रेल्वे कॉलनीजवळ, माउंट कारमेल शाळेजवळ-अग्रसेन चौक, नवीन बस स्टॅन्ड- महसूल कॉलनी रोड, जुने बस स्टॅन्डसमोर-फतेह चौक (शास्त्री स्टेडियम-गेट नं. २), अशोक वाटिका ते जिल्हा कारागृहापर्यंत, गांधी-जवाहर बाग गेट ते जनता भाजी बाजार गेटपर्यंत, जठारपेठ चौक (मनपा कॉम्प्लेक्सच्या बाजूला), खंडेलवाल ज्वेलर्सच्या बाजूला- मनपा हिंदी शाळा, वसंत देसाई स्टेडियम (पश्चिम बाजूच्या भिंतीलगत) असे एकूण १२ वाहनतळे आहेत. १३ लाख ६४ हजारांच्या करारात विविध कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती; मात्र हा करार ३० एप्रिल २०१९ रोजी संपुष्टात आला. दोन महिने झाले तरी नव्याने कंत्राट वाढवून दिलेला नाही.त्यामुळे येथील कंत्राटदार अजूनही अकोल्यातील वाहनधारकांचे खिसे कापण्याचे कार्य करीत आहे. दोन महिन्यांपासून महापालिकेचा बुडत असलेला महसूल थेट कंत्राटदारांच्या खिशात जात आहे. स्पर्धात्मक निविदा जास्त रकमेच्या प्राप्त झाल्याच्या नावाखाली कंत्राटी निविदा लांबणीवर पडल्या आहेत. एकीकडे मुंबई महापालिका वाहनतळाशिवाय वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करून दंडात्मक महसूल गोळा करीत आहे, तर अकोला महापालिका आहे तो महसूलही पाण्यात सोडत आहे. वाहनतळाच्या कंत्राटी निविदा काढून अकोला महापालिकेने कारवाईतून महसूल गोळा करावा, अशी मागणी पुढे येत आहे.वाहनतळाचा करार संपुष्टात आलेला असताना अनधिकृतपणे वसुली करणाºया कंत्राटदारांवर मनपा प्रशासन कारवाई का करीत नाही, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच त्यांना हिरवी झेंडी तर दिली नाही ना, याची चौकशी झाली पाहिजे.-पप्पू कोंगरे, वाहन चालक, अकोला.
३० एप्रिल रोजी वाहनतळ कंत्राटदारांचा करार संपला आहे. नवीन करारनामा करण्यासाठी सभागृहात लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येईल.-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा अकोला.